Girnar Parvat Yatra : विविध मराठी मालिका आणि चित्रपटांमधून घराघरांत पोहोतलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच दीप्ती भागवत. आपल्या सहज सुंदर अभिनयाने दीप्तीने कायमच सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. इतकंच नव्हे तर आता दीप्तीप्रमाणे तिची लेक जुई भागवत सुद्धा मराठी इंडस्ट्रीत सक्रिय आहे. अभिनेत्री नुकतीच गिरनार यात्रेला गेली होती. गिरनार पर्वत हा गुजरात राज्यातील जुनागड जिल्ह्यात आहे. गिरनार हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. शिखरावर जाण्यासाठी एकूण दहा हजार पायऱ्या असून, पायी यात्रेसाठी साधारण ४ ते ५ तासांचा वेळ लागतो. यावेळचा खास अनुभव दीप्तीने पोस्ट शेअर करत सर्वांना सांगितला आहे.
दीप्ती भागवतची पोस्ट…
जय गिरनारी – अवधूत चिंतन -श्री गुरूदेव दत्त!
दिनांक – २० जुलै २०२६गुरुसेवा दिनानिमित्त जुळून आलेला पुनश्च गिरनार योग म्हणजे अमृत वृष्टीचा अद्भुत आनंद!!! ही पहिलीच वेळ होती – श्री क्षेत्र गिरनार तपोभूमीत आषाढात-भर पावसात जाण्याची…कधी पावसाची संततधार, कधी कोसळता पाऊस, भिजऱ्या पावलांनी होत असलेलं पर्वत आरोहण, प्रचंड वारा, झाडापानांची सळसळ… सर्वांगावर होणारा जलधारांचा जलाभिषेक तर कधी औदुंबरातून झालेला जलबिंदूचा सुखावह थेंब वर्षाव… सारं काही अलौकिक… यापूर्वी कधीही न अनुभवलेलं गिरनार पर्वताचं पावसाळी रूप, माझ्यासाठी त्या दिव्य दर्शनाचा हा प्रथमच योग होता… अंतर्बाह्य जलाभिषेकात न्हाऊन निघणाऱ्या पर्वतराज गिरनाराचा यावेळेचा दिमाखच काही निराळा होता. त्याच्या भिजण्याचा जणू एक सोहळा सुरू असावा असा तो भासत होता…पर्वतावरील प्रत्येक पाषाण एक ओलेतं सौंदर्य लेऊन जणू लखाखत होता… भिजून भिजून तो अजिबात दमत नव्हता तर अखंड जल अभिषेकातून पावित्र्य मांगल्याच रूप होत होता…त्याच्यातून फुटलेले शुभ्रतेचे पाझर झरे, थेंबाचे ओघळ किती हो लोभसवाणे… त्याचा हेवा वाटावा असे…तसा गिरनार पर्वत दत्त भक्तीत कायम भिजत असतो पण पर्जन्य वृष्टीत त्याला भिजताना, त्याच्या ओलेत्या रूपाकडे पाहून खरंच कृतार्थ होत होते मी…कोणत्याही पारायणात जलाभिषेक अतिशय महत्वाचा असतो आणि नामाच्या अनुसंधानात ते पारायण होतं…पावसाळा म्हणजे निसर्गाचं चार महिन्यांचं पवित्र पारायण… चराचराला चैतन्य देणार… अशा या निसर्गाच्या पारायणातील चार महिने होणारा वर्षाभिषेक म्हणजे सृजन हरितव्रताचं पवित्र अनुष्ठान…
पर्वत शिखरावरील मार्ग जेव्हा शुभ्र सजल होतात… तेव्हा निसर्गाच्या प्रत्येक रूपाबद्दलची कृतार्थता अधिक वाटते… पर्जन्याच्या आगमनात – आधी पर्वत स्वतः भिजतो आणि त्या आनंदातून तो अवघं त्रिभुवनाला भिजवतो … एक नक्की, आषाढ वारी संपूर्ण चराचर भिजवते… आणि या वारीत सामील होणारी प्रत्येक भक्त माऊली भक्ती सुखात भिजतेच… मग ती वारी श्री क्षेत्र पंढरपूरची असो किंवा गुजरात मधील जुनागढ येथील पवित्र तीर्थ – क्षेत्र श्री गिरनारची असो… कोणत्याही ऋतूत महिन्यात इथे येण्याचे कोणतेही कठोर नियम किंवा अटी नाहीत.. फक्त इथे पाहिजे शुद्ध भक्ती नेम आणि शाश्वत निसर्ग प्रेम… पायरीकडे बघत नुसत चालू नये, पायरी संख्या ही मोजू नये… तर दत्त नाम घ्यावं, चौफेर निसर्गाकडे बघावं…आनंदात चालावं मग झाडं, पाषाण, वेली आणि एकूणच चराचर – पंच महाभूत आपल्याशी सलगी करतात… आणि मिळतं ते अपार सुख…..पावसाळी सरींचा वर्षाव फक्त शरीर भिजवत नाही, त्याचं बरसण आत सुरू होतं… जगण्याचं सार्थक होतं .. आणि सुरूच राहते ती अखंड चैतन्याची अद्भुत आनंद वृष्टी !!!
इति श्री गुरूचरार्पणमस्तु
शुभम भवतू
जय गिरनारी
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त!
दीप्तीच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने, “शिखरावर पोहोचायला किती वेळ लागला?” असंही दीप्तीला विचारलं आहे. यावर दीप्तीने, “मध्यरात्री १२:४५ ला यात्रेला सुरुवात केली आणि गुरुशिखरावर पहाटे साडेपाचला पोहोचले” असं उत्तर दिलं आहे.
