Dipti Ketkar on Pregnancy decision: अभिनेत्री दीप्ती केतकर लवकरच ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे काही प्रोमो सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अभिनेत्रीला पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
याआधी दीप्तीने ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, ‘कमला’, ‘अवघाची संसार’, ‘भागो मोहन प्यारे’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘जमाई राजा’, ‘मला सासू हवी’ अशा विविध मालिका आणि चित्रपटांतून आपले अभिनयकौशल्य दाखवून दिले आहे.
काही दिवसांपूर्वी तिने राजश्री मराठीला मुलाखत दिली होती. त्यामध्ये सध्या खूप स्पर्धा आहे. त्यामुळे एक भीती असते की एक तर लग्न करावं का? आणि लग्न केल्यानंतर आपण बाळाचा विचार करायचा का? कारण- प्रेग्नन्सीनंतर काम मिळेल का, असे अनेकविध प्रश्न अनेकांना पडतात. तू असा विचार कधी केला होतास का, असा प्रश्न तिला विचारला गेला होता.
त्यावर ती म्हणाली, “मी ‘कुंकू’ मालिकेत काम करीत होते. त्यावेळी मी प्रेग्नंट होते. ‘कुंकू’ मालिकेत मी काम करण्याआधी मला ‘अवघाची संसार’ मालिकेतून ओळख मिळाली होती. त्याआधी मी बालकलाकार म्हणून काम केलं होतं.”
“मी माझ्या निर्णयावर ठाम होते”
“‘कुंकू’ मालिकेत काम करीत असताना मला एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मला त्या चित्रपटाचे मानधन मिळाले होते. माझे सहकलाकारदेखील मोठे लोकप्रिय होते. त्यामुळे मला ते निर्माते म्हणाले की, तू विचार कर. तुझं करिअर खूप चांगलं सुरू आहे. पण, मी माझ्या निर्णयावर ठाम होते. मी माझ्या त्या निर्णयाबद्दल एकदाही विचार केला नाही. ‘कुंकू’च्या निर्मात्यांनी मला पाठिंबा दिला. मी प्रेग्नंट असताना सहा महिन्यांपर्यंत शूटिंग केलं. मालिकेत सुरुवातीला मी स्कर्ट आणि टॉपमध्ये दिसायचे. नंतर पोट वाढल्यामुळे मी कुर्त्यामध्ये दिसू लागले. मला वाटतं तो सर्वोत्तम निर्णय होता.
पुढे अभिनेत्री म्हणाली, “मला असं वाटतं की, वेळेत गोष्टी झाल्या की, एका स्त्रीसाठी ते बरं असतं. मग गोष्टी संतुलित प्रमाणात राहतात. त्या वेळी तुमच्यात जो निरागसपणा असतो, तुम्ही लवचिक असता, त्यामुळे तुम्ही गोष्टी अॅडजस्ट करता. तिशीनंतर तुम्ही बदलता. शारीरिकदृष्ट्यादेखील अनेक बदल होतात. त्यामुळे मी घेतलेल्या निर्णयांची मला खूप मदत झाली. मला स्थिर होण्यास मदत झाली.” हे सांगताना दीप्ती असेही म्हणाली की, हे माझं म्हणणं आहे आणि मी ते कोणावर लादत नाही.
याच मुलाखतीत अभिनेत्रीने हेदेखील सांगितले की, तिचं अरेंज मॅरेज झालं आहे. तिचं लग्न २६ व्या वर्षी ठरलं होतं आणि २७ व्या वर्षी तिनं लग्नगाठ बांधली.
दरम्यान, दीप्तीची नवीन मालिका १ डिसेंबर २०२५ रोिजी प्रदर्शित होणार आहे. आता या मालिकेतून दीप्ती पुन्हा एखदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
