Disha Vakani Father Passes Away : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा वकानीला पितृशोक झाला आहे. अनेक वर्षे त्यांनी अभिनय क्षेत्रात अनेक नाटक, चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
‘इंडिया फोरम’च्या वृत्तानुसार हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री दिशाचे वडील ज्येष्ठ अभिनेते भीम वकानी यांचे निधन झाल्याने दिशा व तिचा भाऊ मयूर वकानी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी दीर्घकाळ महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले, तरी त्यांच्या निधनामुळे त्यांच्या जवळच्या व्यक्तींसह संपूर्ण मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
मयुर वकानीने दिली वडिलांच्या निधनाची माहिती
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार भीम वकानी यांच्या निधनाची बातमी त्यांच्या मुलाने, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये सुंदर हे पात्र साकारणारा अभिनेता मयूर वकानीने सोशल मीडियावरून दिली. त्यांने सांगितले की त्याच्या वडिलांचे सकाळी दु:खद निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार अहमदाबाद येथे होतील, जिथे कुटुंबीय आणि जवळचे मित्र शेवटचा निरोप देण्यासाठी जमतील. भीम वकाणी यांच्या निधनामुळे सध्या वकानी कुटुंब खूप कठीण परिस्थितीतून जात आहेत.
भीम वकानी यांचा अभिनयाचा प्रवास खूप समृद्ध करणारा होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात गुजराती रंगभूमीपासून केली. नंतर ते हिंदी चित्रपटांकडे वळले आणि ‘लगान’, ‘स्वदेस’ व ‘लज्जा’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. त्यांनी यामध्ये जरी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका साकारल्या असल्या तरी त्यांनी त्यांच्या अभिनयशैलीने अनेकांचं लक्ष वेधलं.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये केलं होतं काम
विशेष म्हणजे भीम वकानी यांनी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेच्या एका भागात काम केले होते. याच मालिकेमुळे त्यांची मुलगी दिशा वकानी घराघरात पोहोचली. मालिकेच्या एका भागात त्यांनी ‘मावजी छेडा’ ही भूमिका साकारली होती आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवली होती.
