Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: काही कलाकार आणि काही कलाकृती कधीही विसरता येत नाहीत. अनेक वर्षांनंतरही त्यांची चर्चा होते, त्यांचे कौतुक होते. अशाच मोजक्या कलाकारांपैकी एक ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’फेम अभिनेत्री दिशा वकानी ही आहे.
दिशा वकानीचा चाहतावर्ग मोठा आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत अभिनेत्रीने दयाबेन हे पात्र साकारले होते. २००८ ला सुरू झालेल्या या मालिकेतील दयाबेन आणि जेठालाल या जोडीने लवकरच प्रेक्षकांचे मन जिंकले.
बोलण्याची वेगळी शैली, गरबा खेळण्याची स्टाईल, डायलॉग अशा विविध कारणांनी दयाबेन हे पात्र गाजले. तिच्या विचारांनी आणि वेगवेगळ्या योजनांनी जेठालालला सतत चकित करणारी आणि सोसायटीमधील सर्वांची लाडकी दयाबेन प्रेक्षकांचीही लाडकी झाली. घरावर किंवा सोसायटीमधील कोणत्याही सदस्यावर संकट आले तरी त्यावर उपाय असणारी, तसेच तिच्या विविध गोष्टींनी हसवणाऱ्या दयाबेनचे पात्र लोकप्रिय ठरले. या पात्रामधून दिशा वकानीचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.
२०१७ मध्ये दिशा वकानीने मालिकेतून ब्रेक घेतला. बाळाच्या जन्मानंतर ती पुन्हा मालिकेत येईल असे म्हटले गेले. मात्र, अनेक वर्षे वाट पाहिल्यानंतरही दिशा मालिकेत परतली नाही. त्यानंतर तिने मालिका कायमची सोडली असल्याचे म्हटले जाऊ लागले. काही वेळा निर्मात्यांनी दिशाबेन लवकरच परतणार असल्याचेही सांगितले. तसेच अनेक कलाकारांनीदेखील निर्मात्यांनी दिशाला परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र दिशा मालिकेत परत आली नाही.
काही कलाकारांनी दिशा तिच्या वैयक्तिक कारणांमुळे मालिकेत परत आली नाही, तिच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे असे सांगितले. तरी आजही चाहत्यांना दिशा पुन्हा एकदा दयाबेनच्या भूमिकेत दिसेल अशी आशा असते. आजही चाहते दिशाची वाट पाहताना दिसतात. विशेष म्हणजे, कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात असतात. तसेच ते विविध कारणांनी प्रसिद्धीझोतात येतात. दिशा मात्र या सगळ्यापासून लांब असल्याचे दिसते.
दिशा वकानीचा ‘हा’ फोटो पाहिलात का?
असे असले तरी दिशाचे फॅनपेज सतत तिचे विविध फोटो शेअर करत असतात. आता एका फॅनपेजने तिचा नुकताच एक फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिचा लूक खूप साधा आहे. तिने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे, त्यावर पांढऱ्या रंगाची ओढणी पाहायला मिळत आहे. तसेच तिने चष्माही घातला आहे. या सगळ्यात तिच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. दिशा सध्या ४७ वर्षांची आहे.
दरम्यान, मालिकेतून एखाद्या कलाकाराने एक्झिट घेतल्यानंतर ते पात्र दुसरा कोणतातरी कलाकार साकरतो, पण दिशाने मालिका सोडली असली तरी आजही दयाबेनच्या भूमिकेत कोणतीही अभिनेत्री दिसली नाही. आता आगामी काळात ही भूमिका कोणी साकारणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

