‘द 50’ फेम अभिनेत्री दिव्या अग्रवाल सध्या पतीबरोबर राहत नसल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून होत होत्या. द 50 मध्ये दिव्याची मैत्रीण भव्याने याबाबत खुलासा केला होता. त्यानंतर आता दिव्यानेच या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडलं आहे. आपण पतीबरोबर राहत नसून वेगळ्या घरात राहत असल्याची कबुली दिव्या अग्रवालने स्वतः दिली आहे.

भव्याने दिव्याला ‘गोल्ड डिगर’देखील म्हटलं होतं. आता दिव्याने त्यावर प्रत्युत्तर देत स्वतःला ‘डायमंड डिगर’ म्हटलंय. “मी पैशाच्या मागे धावत नाही, पण मला स्वतःला हिरा शोधणारी म्हणवून घ्यायला मला आवडतं. कारण माझा नवरा, अपूर्व हिरा आहे,” असं दिव्या अग्रवाल म्हणाली.

दिव्या अग्रवाल पतीपासून वेगळी राहते

दिव्याने सांगितलं, हो ती आणि तिचा पती अपूर्व सध्या वेगळे राहतात. अपूर्व त्याच्या कामाच्या ठिकाणाजवळ त्याच्या आई-वडिलांबरोबर राहतो आणि दिव्या तिच्या कामाच्या ठिकाणाजवळ राहते. पण त्यांच्यातील प्रेम अजूनही एखाद्या गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडसारखंच आहे. ते अजूनही एकमेकांवर खूप प्रेम करतात, एकमेकांना भेटतात आणि रोज सकाळी एकमेकांना मेसेजही करतात. दिव्याच्या मते, लोकांना अर्धवट माहिती मिळते, ज्यामुळे गैरसमज निर्माण होतात.

दिव्या शोमधून बाहेर पडल्यावर पतीची प्रतिक्रिया

दिव्याला विचारण्यात आलं की, The 50 मधून बाहेर पडल्यावर तिचा पती अपूर्वची प्रतिक्रिया काय होती? दिव्या म्हणाली की अपूर्वने तिला गंमतीत विचारलं, “तू हा शो का जिंकू शकली नाहीस?” त्यावर दिव्याने उत्तर दिले की, तिला ‘द ५०’ हा शो कधीच जिंकायचा नव्हता. प्रत्येक शो जिंकणं आवश्यक नसतं. शोमधून बाहेर आल्यानंतर अपूर्वने तिची खूप काळजी घेतली.

दिव्याने पुढे सांगितलं की, ती घरी आल्यावर अपूर्वने तिला खूप छान आणि चविष्ट पदार्थ खाऊ घातले. कारण स्वादिष्ट जेवणानेच दिव्या लवकर बरी होऊ शकते, असं अपूर्वला वाटतं. दिव्याने नेहमी आनंदी आणि निरोगी राहावं अशी अपूर्वची इच्छा असते. तो खूप सपोर्टिव्ह आहे, असंही दिव्याने नमूद केलं.

२०२४ मध्ये दिव्या अग्रवालने अपूर्व पाडगावकरशी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. या लग्नात फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. पण लग्नानंतर लगेचच त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले. लोकांनी असा दावा केला की दिव्याने पैशासाठी अपूर्वशी लग्न केलं. त्यानंतर काही दिवसांनी दिव्याने सोशल मीडियावरून तिच्या सर्व पोस्ट डिलीट केल्या, तेव्हा दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं गेलं होतं.