सासूबाईंनी फोटो न पाहताच लोकप्रिय अभिनेत्रीला सून म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. ही गोष्ट एखाद्या चित्रपटातली वाटत असली तरी ही खरी आहे आणि ही अभिनेत्री आहे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या पुगावकर. दिव्याने व तिच्या नवऱ्याने अक्षय घरतने त्यांची प्रेमकहाणी सांगताना हा किस्सा सांगितला आहे.
दिव्या पुगावकरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिची हटके प्रेमकहाणी सांगितली आहे. यावेळी तिच्याबरोबर उपस्तिथ असलेल्या तिच्या नवऱ्याने हा किस्सा सांगत आता तिच दिव्या त्याच्या घरी सगळ्यांची लाडकी झाल्याचं म्हटलं आहे. दिव्या व अक्षय यांची प्रेमकहाणी आजच्या काळातील इतर जोडप्यांसारखी सोशल मीडियामुळेच सुरू झाली असली तरी त्यांची प्रेमकहाणी खास आहे. या दोघांची लव्हस्टोरी कशी आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत दिव्या व अक्षय यांना त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल विचारण्यात आलं होतं. यावेळी दिव्याने फेसबुकवर अक्षयने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर सुरू झाल्याचं सांगितलं. सुरुवातीला दोघे लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते परंतु, तिची ‘मुलगी झाली हो’ ही पहिली मालिका संपल्यानंतर ती मुंबईत आल्यानंतर त्यांच्यातील अंतर कमी झालं. परंतु, ऐरवी प्रेमकहाणी म्हटलं की मुलीकडचे मुलाची परिक्षा घेतात मात्र इकडे मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीची जवळपास प्रश विचारुन परिक्षाच घेतली होती.
अभिनेत्री असल्याने सासूबाईंनी केलेलं नापसंत
मनोरंजन विश्वातील कामाची पद्धत, वेळा आणि या चमकणाऱ्या जगामागचा अंधार, परिश्रम, तिथे काम करणारी माणसं याबद्दल अक्षयच्या आई-वडिलांना खात्री नसल्याने तो प्रेम करत असलेली मुलगी याच क्षेत्रातली आहे कळल्यानंतर त्यांना काळजी वाटली होती आणि म्हणून त्याच्या आईने दिव्याचा फोटोही न पाहता तिला नापसंत केलं होतं असं त्याने या मुलाखतीत सांगितलं. अक्षयला दिव्या या क्षेत्रात काम करते याबद्दल घरी सांगितलं होतसं का असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “हो सांगितलेलं. कारण या क्षेत्राशी माझ्या कुटुंबाचा काहीच संबंध नव्हता. सामान्य माणसांना एवढंच माहीत असतं की या क्षेत्रात कामाच्या वेळा ठरलेल्या नसतात आणि कामाची शास्वतीही नसते म्हणून आईने आधीच नाही म्हटलं होतं. मी म्हटलं माणगावची आहे मलाडला राहते पण आईने फोटोही नव्हता पाहिला आणि ती नाही म्हणालेली.”
अक्षय पुढे म्हणाला, “नंतर मी एकदा ठरवून माझ्या आत्याच्या घरी माझ्या आई-बाबांना बोलावलं आणि तिथे दिव्या आली होती. तेव्हा त्यांची भेट झाली. ती बोलण्यात एकदम हुशार आहे. तिला माहीत आहे कोणाशी कसं, किती बोलायचं. ते तिला छान जमतं मग मी बाहेर गेलो आणि बेडरूममध्ये आई बाबा, दिव्या आणि बाकीचे नातेवाईक बोलत होते. त्यावेळी मुलगी झाली हो सुरू झालेली. माझ्या घरच्यांना वाटत होतं की हे सुरू तर झालंय पण पुढे नाही जाणार. पण तसं काहीच झालं नाही. आमचं लग्न ठरल्यानंतरही त्यांना खात्री नव्हती पण पुढे त्यांना कळलं की ती किती जीव लावते, माझ्यावर किती प्रेम करते. त्यानंतर मग सगळं सुरळीत झालं”
दिव्या पुढे तिच्या लव्हस्टोरीची सुरुवात कशी झाली याबद्दल म्हणाली, “मी कमिटमेंटच्या शोधात होते. पण कोविड सुरू होता त्यामुळे जर फेसबुकवर कोणी विचारलं असेल तर कोणालाही विश्वास बसणार नाही. मला इतकी अपेक्षा नव्हती की बोलणं सुरू होईल, मग एक व्यक्ती येईल आपल्याल भेटायला. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा आमच्या दोघांचं एकमेकांबद्दलचं मत खूपच वेगळं होतं. जेव्हा आम्ही समोरासमोर आलो तेव्हा त्याचं असं झालं की ही खूपच लहान आहे. कारण तो फिटनेस मॉडेल आहे. तो असं म्हणाला होता की मी काय सांगून तुला घरी घेऊन जाऊ ते म्हणतील कुठल्या लहान मुलीला घेऊन आला आहेस तू. माझंही तसंच काहीसं मत होतं कारण तो उंच, त्यात फिटनेस मॉडल आणि लॉकडाऊनमुळे केसही वाढवले होते. माझी माझ्या जोडीदाराबद्दलची जी छबी होती ती खूप वेगळी होती”.
पहिल्या भेटीतच एकमेकांना नापसंत केलं
दिव्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगत म्हणाली, “पाच मिनिटांची भेट होती. तो आला त्याने मला पाहिलं मी त्याला पाहिलं. काय बोलावं हे सुचत नव्हतं. एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत राहिलो. त्याने चॉक्लेट्स आणले होते कारण मला ते आवडतात आणि सहाव्या मिनिटाला तो म्हणाला की मी निघतो मीसुद्धा हो हो मला पण जायचं आहे असं सांगितलं. तेव्हा माझी मालिकाही सुरू नव्हती झाली. त्यानंतर रात्री आम्ही एकमेकांना सांगितलं की तू मला अपेक्षित आहे तशी मुलगी नाहीये आणि तू मला अपेक्षित तसा मुलगा नाहीयेस. मग बोलणं थांबवूया असं ठरलं, पण आमची मैत्री खूप छान झाली होती. त्यामुळे बोलणं सुरूच होतं. एक वेळ अशी आली जेव्हा तो म्हणाला की आता मी नाही राहू शकत मग म्हटलं ठिक आहे बोलणं सुरू ठेऊया आणि नंतर सहा वर्षांनंतर आम्ही लग्न केलं”.
दरम्यान, दिव्या व अक्षय घरत यांची सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर पुढे प्रेमात झालं. लग्नापूर्वी दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं. त्यानंतर फ्रेब्रुवारी २०२५मध्ये ही जोडी लग्नबंधनात अडकली.
