Divyanka Tripathi video went viral: सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, ज्याचा उपयोग सर्व वयोगटातील, सर्व स्तरातील लोक करतात. सोशल मीडियावर विविध कंटेंट असलेले व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यावरून अनेकांचे कौतुक होते तर अनेकांना ट्रोल व्हावे लागते. विज्ञान, मनोरंजन, पर्यावरण, जंगले, प्राणी, नद्या अशा विविध विषयांवरील कंटेंट सोशल मीडियावर पाहायला मिळतो. अनेक कलाकारही विविध पोस्ट, व्हिडीओ, रील्स शेअर करतात. या माध्यमातून ते थेट चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अनेकदा त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल ते गोष्टी शेअर करत असतात, तर काही वेळा त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टीही शेअर करतात. चाहते त्यावर कमेंट करत त्यांची मते नोंदवतात.

याबरोबरच अनेकदा पापाराझी कलाकारांचे काही व्हिडीओ शेअर करतात. त्यांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा आहे. गेल्या काही दिवसांपासून दिव्यांका चर्चेत आहे. तिला जुळी मुले झाली आहेत. २६ मे २०२६ ला तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर तिचा पती विवेक दहियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. त्यानंतर या सेलिब्रिटी जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता.

दिव्यांका व तिचे कुटुंब बाळांना घेऊन दवाखान्यातून घरी आले, तेव्हा तिथे काही पापाराझी होते. विवेक व दिव्यांका यांनी त्यांच्या बाळांना घेतले होते. पापाराझींसाठी त्यांनी बाळांसह पोझही दिल्या, मात्र बाळांचे चेहरे दाखवू नका अशी त्यांनी पापाराझींना विनंती केली. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या सगळ्यात एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

बाळाला घरी घेऊन जाताना दिव्यांका त्रिपाठीने केली ‘ती’ कृती

दिव्यांका तिच्या बाळाला घेऊन तिच्या घरी जात होती, त्यावेळी तेथील सिक्युरिटीने दिव्यांकाला पाहून हात हलवत ओळख दाखवली. त्यावेळी दिव्यांका त्या व्यक्तीजवळ गेली, त्याला बाळाचा चेहरा दाखवला. त्या व्यक्तीनेही बाळाला पाहून त्याला आशीर्वाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर दिव्यांका हसत पुढे गेल्याचे दिसत आहे. तसेच, त्या व्यक्तीच्याही चेहऱ्यावर हसू दिसत आहे.

दिव्यांकाचे हे वागणे नेटकऱ्यांना भावले आहे. अनेकांनी तिचे हे वागणे गोड असल्याचे म्हटले आहे. एकाने लिहिले, “शेवटी आई ही आईच असते”, दुसऱ्या एकाने लिहिले, “ती खूप प्रेमळ आहे”, एकाने लिहिले, “त्या माणसाने तिच्या प्रति दयाळूपणा आणि आदर दाखवला. तीसुद्धा त्याच्याबरोबर प्रेमाने आणि आदराने वागली”, एकाने लिहिले, “किती गोड”, आणखी एकाने लिहिले, “ती किती प्रेमळ आहे”, एकाने लिहिले, “कारण ती ईशी माँ आहे”, आणखी एकाने लिहिले, “ती किती प्रेमळ व गोड आहे”, तर एकाने लिहिले, “ते काका किती गोड आहेत”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

‘ये हे मोहब्बतें’ या मालिकेतील दिव्यांकाची ईशिता ही भूमिका चांगलीच गाजली होती. तिचे व रुहीचे बॉण्डिंग अनेकांना आवडले होते, त्यामुळेच तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याच मालिकेच्या सेटवर विवेक व तिची भेट झाली होती. त्यांच्यात मैत्री झाली. ते प्रेमात पडले आणि २०१६ ला त्यांनी लग्नगाठ बांधली. आता दिव्यांका व विवेक त्यांच्या जुळ्या मुलांची काय नावे ठेवणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.