‘ये है मोहब्बतें’ फेम अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आई होणार आहे. दिव्यांका आणि तिचा पती विवेक दहिया यांनी ते आई-बाबा होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिव्यांका गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या दोघांनी याबद्दल बोलणं टाळलं होतं. आता दिव्यांकानेच ती गरोदर असल्याची माहिती दिली आहे.
प्रसूती कधी होणार व किती महिन्यांची गरोदर आहे, हे दिव्यांकाने सांगितलं. पत्रकार विकी लालवानीशी बोलताना दिव्यांका म्हणाली, “बाळाचा जन्म जूनमध्ये होणार आहे. मला आणि विवेकला आता बाळ हवं होतं, त्यामुळे आम्ही प्रयत्न केला आणि ही आनंदाची बातमी आम्हाला मिळाली. आमचे आई-वडीलदेखील खूप आनंदी आहेत. मी ही बातमी आधी विवेकला दिली आणि त्यानंतर आम्ही लगेच आमच्या आई-वडिलांना फोन केला. आम्हाला मुलगाच हवा किंवा मुलगीच हवी असं काही नाही. विशेष म्हणजे आम्ही पूर्ण सहा महिने ही बातमी लपवून ठेवण्यात यशस्वी झालो. खरं तर, मी घराबाहेर पडणं टाळलं आणि त्यामुळेच ही गोष्ट कुणाला कळाली नाही.”
चर्चांना सुरुवात कशी झाली?
दिव्यांका पुढे म्हणाली, “बाळासाठी शॉपिंग आम्ही अजून सुरू केलेली नाही, पण लवकरच करू.” दिव्यांका गरोदर असल्याच्या चर्चांना सुरुवात केव्हा झाली, याबाबत तिने स्वतःच सांगितलं. “विवेक एका कार्यक्रमाला गेला होता. तेव्हा आमच्या काही मित्रांनी विचारलं की मी बऱ्याच दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी का दिसत नाहीये. तिथूनच या चर्चांना सुरुवात झाली. बाळाचा जन्म मुंबईतच होईल. आम्ही बाळासाठी कोणतंही नाव ठरवलेलं नाही, पण दोन्ही कुटुंबांमध्ये ‘मुलगा होणार की मुलगी’ असा अंदाज लावण्याचा गमतीशीर खेळ सुरू झाला आहे आणि आम्हाला हे बघून खूप मजा येत आहे,” असं दिव्यांका त्रिपाठीने सांगितलं.
विवेक व दिव्यांका दोघांचेही कुटुंबीय सध्या नवीन सदस्याच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. लवकरच दिव्यांकाचा डोहाळे जेवण समारंभ देखील होणार आहे. हा खासगी सोहळा असेल. त्यात फक्त जवळचे नातेवाईक आणि टीव्ही इंडस्ट्रीतील दोघांचे मोजकेच मित्रमंडळी उपस्थित राहतील.
२०२३ मध्ये एका मुलाखतीत दिव्यांकाने आई होण्याबद्दल तिचं मत व्यक्त केलं होतं. “आई होणं ही एक अमूल्य आणि सुंदर शक्ती आहे. मलाही कधीतरी हा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल. आई होणं ही मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे योग्य वेळ आली की आम्ही हा निर्णय घेऊ,” असं ती म्हणाली होती. या वर्षाच्या सुरुवातीलाही दिव्यांकाने बाळाबद्दल संकेत दिले होते. “आम्ही आई-वडील होण्यासाठी आता मानसिकदृष्ट्या तयार आहोत आणि आमच्यात त्याबद्दल चर्चाही सुरू आहेत,” असं तिने म्हटलं होतं.
दरम्यान, दिव्यांका त्रिपाठी सहा महिन्यांची गरोदर आहे. लवकरच ती व विवेक लग्नानंतर १० वर्षांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करतील.
