Divyanka Tripathi Blessed With Twins : ‘ये है मोहब्बतें’, ‘बनू मैं तेरी दुल्हन’ अशा गाजलेल्या मालिकांमधून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी घराघरांत पोहोचली. नुकतीच तिने आपल्या चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. लग्नानंतर दहा वर्षांनी अभिनेत्री आई झाली असून, तिच्या घरी जुळ्या मुलांचं आगमन झालेलं आहे. दिव्यांका आणि तिचा पती विवेक दहिया यांनी काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. यानंतर दिव्यांकाने डोहाळेजेवणाचे काही सुंदर फोटो शेअर केले होते. आता अभिनेत्रीच्या नवऱ्याने ‘मेरे करण-अर्जुन आ गए’ म्हणत सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्रीने ४१ व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. दिव्यांका आणि विवेक लग्नानंतर दहा वर्षांनी आई-बाबा झाले आहेत. ८ जुलै २०१६ मध्ये हे दोघंही विवाहबंधनात अडकले होते. या दोघांचा शाही लग्नसोहळा मध्य प्रदेशातील भोपाळ येथे पार पडला होता.

दिव्यांका आणि विवेक पोस्ट शेअर करत लिहितात, “अखेर आमची प्रतीक्षा संपली…कारण, आमच्या घरी Boys चं आगमन झालेलं आहे. खरंतर, आताच्या घडीला हा आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण वाटतोय. ‘मेरे करण-अर्जुन आ गए’… आता मी आणि दिव ( दिव्यांका ) आमच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहोत, त्यामुळे तुम्हा सर्वांचे आशीर्वाद कायम आमच्या पाठिशी असुद्यात. #NewParents #Twins #BabyBoys”

दिव्यांका-विवेकने आई-बाबा झाल्याची आनंदाची बातमी शेअर करताच संपूर्ण मनोरंजनविश्वातून या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. नीना कुळकर्णी, प्राची पिसाट, अमृता खानविलकर, सुरभी ज्योती, करिश्मा तन्ना, अंकिता लोखंडे, पूजा गौर, जेमी लिव्हर, आरती सिंग, अमित टंडनपर्यंत अशा अनेक कलाकारांनी या पोस्टवर कमेंट्स करत दिव्यांकाला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दिव्यांका व विवेक यांनी सुरुवातीला ६ महिने ही गुडन्यूज मीडियापासून लपवून ठेवली होती. यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र दिव्यांकाच्या प्रेग्नन्सीची चर्चा रंगल्यावर या जोडप्याने अधिकृत पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी सर्व चाहत्यांबरोबर शेअर केली होती. याशिवाय दिव्यांका-विवेक या दोघांनी सुंदर मॅटर्निटी फोटोशूट सुद्धा केलं होतं.