Dyanada Ramtithkar : ज्ञानदा रामतीर्थकर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अलीकडेच ती खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकली. अशातच नुकतच तिने तिच्या नवऱ्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने तिचा नवरा स्वभावाने कसा आहे याबद्दल सांगत त्याचं कौतुक केलं आहे.

ज्ञानदा रामतीर्थकर ‘स्टार प्रवाह’वरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. यामध्ये ती प्रमुख भूमिकेत असून सध्या ती साकारत असलेलं पात्र काव्या देशमुख गरोदर असल्याचं पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने तिने व तिचा ऑनस्क्रीन नवरा पार्थ देशमुख म्हणजे अभिनेता विजय आंदळकरने राजश्री मराठीला मुलाखत दिली आहे.

ज्ञानदाने यावेळी ऑनस्क्रीन नवरा आणि खऱ्या आयुष्यातील नवरा यांच्यामधील सामन्य गोष्टी सांगत त्यांचं कौतुक केलं आहे. ज्ञानदाने यावेळी तिचा नवरा हर्षदला उत्तम स्वयंपाक करता येतो असं म्हटलं आहे. तर तो स्वभावाने कसा आहे याबद्दल सांगितलं आहे. ज्ञानदा नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात…

ज्ञानदाने केलं नवऱ्याचं कौतुक

ज्ञानदाला या मुलाखतीत हर्षद आणि पार्थ यांच्या स्वभावात काय साम्य आहे असं विचारल्यानंतर म्हणाली, “दोघांमधील साम्य सांगायचं झालं तर दोगेही मोजकं आणि मुद्देसूद बोलतात. दोघेही कुटुंबला प्राधान्य देणारे आहेत. पार्थचं काव्यावर आणि हर्षदचं ज्ञानदावर प्रेम आहे. ग्रीन फ्लॅग नवरा आहे. दोघांनाही स्वयंपाकाची आवड आहे. “

ज्ञानदाने पुढे तिचा नवरा तिचा सगळ्यात मोठा टीकाकार आहे असं सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणाली, “तो माझा सगळ्यात मोठा क्रिटिक आहे. त्याला मी कमी मेकअप केलेला आवडतो. त्याचं असं असतं की टीव्हीवर तुला बघतो ना तशा लूकमध्ये मग परत घरी पण तसं नको असं म्हणतो. तो नेहमी मला त्याची मतं सांगत असतो की एखाद्या लूकचा फोटो पाठवला तर टिकली मोठी लावलीये, साडीचा रंगा वेगळा आहे का अशा अनेक गोष्टी सांगत असतो.”

दरम्यान, ज्ञानदाने अलीकडेच तिचा प्रियकर हर्षदबरोबर थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. इंडस्ट्रीतील तिच्या कलाकार मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. दोघांचे लग्नातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियाव व्हायरल झाले होते.