मनोरंजन विश्वात काम करत असताना अनेकदा कलाकारांना वेगवेगळे सीन करावे लागतात. खऱ्या आयुष्यात कठीण प्रसंगातून जात असले तरी पडद्यावर मात्र काहीवेला त्याचवेळी विनोदी सीन करावे लागतात तर कधी इंटीमेट सीनही कथेची गरज असल्याने त्यांना करावे लागतात असं काही कलाकार मुलाखतींमधून बोलताना दिसतात. यासह काही कलाकार खऱ्या आयुष्यात जरी धुम्रपान करत नसले, त्यांना कुठलं व्यसन नसलं तरी त्यांना पडद्यावर मात्र तसे सीन करावे लागतात. असंच काहीसं घडलं होतं मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरबरोबर.

ज्ञानदा रामतीर्थकरने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिने या व्यतिरिक्त इतर माध्यमांमध्येही काम केलं आहे. अशातच तिने एका वेब सीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. यावेळी तिने त्या सीरिजसाठी तिला स्मोक करण्याचा सीन करायचा होता ज्यासाठी तिला संकोच वाटलेला असंही सांगितलं आहे. यावेळी तिने हा सीन करण्याआधी तिच्या आई-वडिलांची परवानगी घेतली होती असं सांगितलं आहे.

ज्ञानदाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ती कधीही कुठलीही कलाकृती, जाहिरात करण्यापूर्वी तिच्या घरच्यांना ते पाहिल्यानंतर काय वाटेल हा विचार करते असं म्हटलं आहे. ज्ञानदाने बी द लाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की तिच्या आई-वडिलांनी वेब सीरिज म्हणजे काय असतं हे त्यांना माहीत नसतानाही तिला परवानगी देत पाठिंबा दिल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्री नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात.

ज्ञानदाने सांगितला किस्सा

ज्ञानदा मुलाखतीत जुना किस्सा सांगत म्हणाली, “नवीन प्रोजक्टबद्दल मी त्यांच्याशी चर्चा करते आणि त्यांची प्रतिक्रिया माझ्यासठी फार महत्त्वाची असते. एक किस्सा आहे. एकदा मला एका मराठी वेब सीरिजसाठी धुम्रपान करण्याचा सीन करायचा होता. मी ते त्यांना सांगितलं आणि मला आठवतंय की माझे वडील म्हणाले होते की ही वेब सीरिज वगैरे प्रकरण तर आम्हाला कळत नाही पण, हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे असं तुला वाटतं, हे पात्र तुला आवडलंय का त्यातून तुला काही मिळणार आहे का? असं विचारलं आणि माझं उत्तर हो असं होतं. कारण मुळात त्यावेळी वेब सीरिज हा प्रकारच नवीन होता.”

ज्ञानदा पुढे म्हणाली, “मग ते म्हणाले की ठीक आहे कर तू पण, धुम्रपान कसं करायचं हे मी तुला शिकवणार दुसऱ्या कोणाकडूनही तू शिकायचं नाहीस. हे घारत करायचं जे काही करायचं आहे. दुसरं कोणी नाही सांगणार. तुझं काम आहे, तुझ्या पात्राची गरज आहे आमच्या सगळ्यांचा तुला पाठिंबा आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे.