Dnyanada Ramtirthkar Lovestory : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काव्याची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. ज्ञानदा व हर्षद यांचा लग्नसोहळा ८ मे रोजी थाटामाटात पार पडला. काही महिन्यांपूर्वीच साखरपुड्याचे फोटो शेअर करत ज्ञानदाने तिच्या तमाम चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री हर्षद आत्मारामसह विवाहबंधनात अडकली आहे.

ज्ञानदाचा पती हर्षद आत्माराम सिनेमॅटोग्राफर, DOP आहे. या दोघांची पहिली भेट २०१५ मध्ये एका शॉर्ट फिल्मच्या शूटिंगदरम्यान झाली होती. यानंतर हळुहळू दोघांमध्ये छान मैत्री झाली आणि २०१९ मध्ये हर्षदने ज्ञानदाला लग्नासाठी विचारलं होतं. आता रिलेशनशिपला सहा-सात वर्षे पूर्ण झाल्यावर हे दोघंही लग्नबंधनात अडकले आहेत.

काही दिवसांपूर्वी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ज्ञानदाने तिच्या नात्याविषयी सर्वांना सांगितलं होतं. ज्ञानदा म्हणाली होती, “मी २२व्या वर्षी याच्या प्रेमात पडलीये. आमच्यात ७ वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे सुरुवातीला हर्षदचं असं म्हणणं होतं की, तू वेळ घे विचार घे. पण, माझं आधीपासूनच सगळं ठरलं होतं. मग पुढे जेव्हा त्याने लग्नासाठी विचारलं तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता कारण माझं ठरलं होतं की, आपल्याला याच्याशीच लग्न करायचंय.”

हर्षद ज्ञानदाच्या स्वभावाबद्दल म्हणाला होता, “ती समोरच्या व्यक्तीची खूप प्रेमाने काळजी घेते. तिला सर्वांबद्दल आपुलकी वाटते. माझं असं झालेलं अरे हा स्वभाव किती छान आहे…त्यामुळे आपसूकच आमचं बॉण्डिंग झालं.”

ज्ञानदा मुंबईत राहायची तर, हर्षद पुण्याला त्यामुळे त्यांचं हे लाँग डिस्टन्स प्रेम हळुहळू फुलत गेलं. या दोघांनीही गेल्या काही वर्षांत एकमेकांना खंबीर साथ दिली. आता ज्ञानदा व हर्षद साता जन्माचे सोबती झाले आहेत.

दरम्यान, ज्ञानदाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काव्या देशमुख ही मुख्य भूमिका साकारत आहे. तिच्यासह या मालिकेत विवेक सांगळे, विजय आंदळकर, मृणाल दुसानिस, ऋजुता देशमुख या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.