‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ अशा विविध लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने ती कायमच सर्वांची मनं जिंकून घेते. ज्ञानदा वैयक्तिक आयुष्यात यावर्षी लग्नबंधनात सुद्धा अडकली आहे. ज्ञानदाचा पती हर्षद आत्माराम हा सिनेमॅटोग्राफर, DOP आहे.

हर्षद आणि ज्ञानदाने नुकतंच त्यांचं कपल इन्स्टाग्राम पेजही सुरू केलं आहे. या पेजचं नाव ‘hd_rolling’ असं आहे. या पेजवर नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. यामध्ये ज्ञानदा हर्षदचा मेकअप करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

ज्ञानदा मस्त साडी नेसून तयार झालीये. पण, यानंतर ती नवऱ्याचा मेकअप करून देत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा सुंदर क्षण हर्षदने रेकॉर्ड केलाय. तो म्हणतो, “आज मी खास कॅमेऱ्यासमोर बसलोय… कारण, इथे खास माझा मेकअप करणं सुरू आहे. माझा मेकअप करून देतेय माझी धर्मपत्नी…आज एक कोलॅबोरेशन आहे आणि काही ब्रँड्सची कामं करण्याचा योग आलाय. त्यामुळे मनात एक उत्सुकता आणि धाकधूक सुद्धा आहे. बघुयात आता कसं होतंय.”

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “अशी मेकअप आर्टिस्ट मिळायला नशीब लागतं”, “क्युटेस्ट मेकअप आर्टिस्ट”, “कॅमेऱ्यासमोर आल्यावर काय-काय करावं लागतं…वाह वाह”, “अशी सर्वगुण संपन्न बायको मिळायला नशीब लागतं”, “स्वीट कपल”, “इतकी गोड मेकअप आर्टिस्ट असेल तर कसलं टेन्शन”, “वॉव मस्त”, “ज्ञानदा-हर्षद फेव्हरेट कपल” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, ज्ञानदा व हर्षद यांचा विवाहसोहळा ८ मे २०२६ रोजी थाटामाटात पार पडला. ज्ञानदाचा पती हर्षद आत्माराम हा सिनेमॅटोग्राफर, DOP आहे. २०१९ मध्ये हर्षदने ज्ञानदाला लग्नासाठी विचारलं होतं. रिलेशनशिपला सात वर्षे पूर्ण झाल्यावर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या ती ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.