Dnyanada Ramtirthkar Marriage : लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या होणाऱ्या पतीचं नाव हर्षद असून, गेली अनेक वर्षे या दोघांमध्ये खूप छान मैत्री आहे. या दोघांची पहिली भेट २०१५ मध्ये झाली होती. पुढे, २०१९ च्या दरम्यान हर्षदने ज्ञानदाला थेट लग्नासाठी विचारलं होतं. आता रिलेशनशिपला जवळपास सहा ते सात वर्षे पूर्ण झाल्यावर हे दोघंही लग्नबंधनात अडणार आहेत.
ज्ञानदाने या नात्याबद्दल तिच्या घरी कसं सांगितलं. हर्षद जेव्हा पहिल्यांदा ज्ञानदाच्या वडिलांना भेटला तेव्हा त्यांनी होणाऱ्या जावयाला कोणकोणते प्रश्न विचारले याबद्दल या दोघांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
ज्ञानदा रामतीर्थकर म्हणते, “तो दिवस थोडा सीरिअस होता”!
ज्ञानदा रामतीर्थकर म्हणाली, “ज्या दिवशी माझ्या घरी आमच्या नात्याबद्दल सांगायचं होतं…तो दिवस आमच्यासाठी थोडा सिरिअस होता. कारण, मुलाच्या घरी लग्न म्हणजे आनंदाचा क्षण असतो. पण, मुलीच्या घरी लग्न म्हटलं की…एक भावनिक बाजू सुद्धा जोडली जाते. तर, माझ्या आई-बाबांच्या डोळ्यात मला ती भावनिक बाजू दिसत होती. याशिवाय माझा भाऊ सगळे अपडेट्स फोनवर घेत होता. तो हर्षदशी फोनवर बोलला होता.”
आम्हाला सांगायला एवढा वेळ का घेतलास?
यावर पुढे हर्षद म्हणाला, “मला ज्ञानदाच्या वडिलांनी आमच्याबद्दल घरी सांगितल्यावर एक प्रश्न विचारला होता. तो माझ्या अजूनही लक्षात आहे ते म्हणाले, ‘तू आम्हाला सांगायला एवढा वेळ का घेतलास?’ त्यांचा प्रश्न ऐकून मलाही दडपण आलं होतं..पण, नंतर मी त्यांना हा वेळ घेण्यामागचं कारण सांगितलं…याशिवाय घरी केव्हा सांगायचं यासाठी मी नेहमी ज्ञानदाचं मतही विचारात घेतलं, एक योग्य वेळ येण्याची आम्ही वाट पाहत होतो…असं बाबांना सांगितलं.”
“माझं उत्तर ऐकून त्यांनी पुन्हा विचारलं ज्ञानदा काहीपण बोलेल. तुला कधीच वाटलं नाही का की आता जाऊन सांगूया, डायरेक्ट भेटुयात? यावर त्यांना मी म्हणालो होतो, ‘आम्ही दोघंही एकमेकांचं ऐकतो आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी ठरवतो. मग हळुहळू आमच्यात छान बोलणं झालं”, असं हर्षद म्हणाला.
ज्ञानदा यादरम्यान म्हणाली, “बाबांनी आणखी एक प्रश्न त्याला विचारला होता…का आवडते तुला ज्ञानदा?”
शेवटी लग्नाला परवानगी मिळाली, पण बाबा म्हणाले…
“शेवटी बाबा म्हणाले…ठिक आहे हे सगळं तुम्ही ठरवलंय. पण, लग्नाच्या वगैरे सगळ्या इतर गोष्टी आम्ही ठरवणार. दोन्ही कुटुंब चर्चा करून निर्णय घेऊ. तेव्हा माझं असं झालं अच्छा म्हणजे तुम्ही तयार आहात का…तेव्हा मी खूप खूश झालो. कारण, आधी त्यांच्याकडून नकारच आला होता. त्यांचा नकार होकारात बदलण्यासाठी ज्ञानदाने जे प्रयत्न केले त्यासाठी तिला सलाम आहे.” अशा भावना हर्षदने व्यक्त केल्या.
याबद्दल अभिनेत्री सांगते, “सध्या अशी पिढी आहे, जिथे ब्रेकअप होणं खूप कॉमन झालंय. अशा परिस्थितीत आपल्या आई-बाबांना तो एक विश्वास आला पाहिजे की, ही म्हणतेय तर हे नातं तेवढं खरंय…आधी माझ्या आई-बाबांना फक्त हर्षद भेटला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंबांची एकत्र भेट झाली.”
