Dnyanada Ramtirthkar Harshad Aatmaram Wedding Photos :’लग्नानंतर होईलच प्रेम’मधील ‘काव्या’ला खऱ्या आयुष्यातील ‘पार्थ’ भेटला आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली लाडकी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. ज्ञानदा आणि हर्षद आत्माराम आज, शुक्रवार ८ मे रोजी, एका दिमाखदार सोहळ्यात विवाहबंधनात अडकले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नापूर्व विधींची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. ग्रहमख, मेहंदी आणि हळदीचे कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडल्यानंतर, आज या जोडीने मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.

या खास सोहळ्यासाठी ज्ञानदा व हर्षद दोघांनीही अत्यंत सुंदर पेहराव केला होता. ज्ञानदाने आपल्या लग्नासाठी गुलाबी रंगाची सुरेख साडी नेसली होती, ज्यात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते; तर हर्षदने त्याला साजेशी पांढऱ्या रंगाची नक्षीदार शेरवानी परिधान केली होती. या नवदांपत्याचे लग्नातील फोटो आणि व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी आणि कलाविश्वातील मित्र-मैत्रिणींनी या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला असून, त्यांच्या सुखी संसारासाठी शुभेच्छा देत आहेत.

पाहा ज्ञानदा व हर्षदच्या लग्नाचे फोटो

ज्ञानदा व हर्षद यांनी डिसेंबर २०२५ मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर आता त्यांनी पुण्यात लग्नगाठ बांधली. ज्ञानदा व हर्षद यांचा प्रेमविवाह आहे. दोघेही अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

कोण आहे हर्षद आत्माराम?

ज्ञानदा रामतीर्थकरचा पती हर्षद आत्माराम सिनेविश्वात काम करतो. तो सिनेमॅटोग्राफर आहे. हे दोघंही गेली अनेक वर्षे एकमेकांना ओळखतात. हर्षदने ‘बंधू’ या सिनेमासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. हर्षद व ज्ञानदाने एकत्र काम केलं होतं, त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ज्ञानदा मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने मुंबईत असायची, तर हर्षद पुण्यात असायचा. ज्ञानदा व हर्षद इतकी वर्षे लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. यावर्षी दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबियांच्या आशीर्वादाने त्यांनी सुंदर सोहळ्यात लग्नगाठ बांधली.

दरम्यान, ज्ञानदा रामतीर्थकर ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. तिने ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत काम केलं होतं. त्याशिवाय तिने इतरही मालिका केल्या आहेत.