Dnyanada Ramtirthkar Husband Haldi Ceremony : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच ज्ञानदाने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री एका नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. ज्ञानदाच्या घरी आता लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून, तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरी नुकताच हळदी समारंभ पार पडला. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
हर्षदने हळदी समारंभाचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये त्याने कुटुंबीयांसह धमाल केल्याचं पाहायला मिळत आहे. हर्षद व त्याची आई एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अभिनेत्रीच्या फॅनपेजवरून शेअर करण्यात आला आहे. हर्षदबद्दल सांगायचं झालं, तर हर्षद आत्माराम सिनेमॅटोग्राफर, DOP आहे. हर्षदचं सिनेविश्वाशी फारच जवळचं नातं आहे. त्याने ‘बंधू’ या सिनेमासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
ज्ञानदा आणि हर्षद हे दोघंही गेली अनेक वर्षे एकमेकांना ओळखतात. या दोघांची पहिली भेट २०१५ मध्ये झाली होती. तर, २०१९ मध्ये हर्षदने ज्ञानदाला थेट लग्नासाठी विचारलं होतं. याचवेळी त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती.
आता अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांचं ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकारांनी केळवण केलं होतं.
ज्ञानदासाठी ‘ठिपक्यांची रांगोळी’ मधील कलाकारांनी खास जेवणाचा बेत केला होता. सुंदर अशी सजावट करून या सगळ्या कलाकारांनी एकत्र छान फोटोशूट केलं. अभिनेत्री नम्रता प्रधानने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. याशिवाय अभिनेत्री सुप्रिया पाठारे सुद्धा त्यांच्या लाडक्या अप्पूच्या केळवणासाठी उपस्थित होत्या.
दरम्यान, ज्ञानदाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काव्या ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. याशिवाय तिने ‘जिंदगी नॉट आऊट’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘सख्या रे’, ‘शतदा प्रेम करावे’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे.
