Dnyanada Ramtirthkar Lovestory : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. महिन्याभरापूर्वीच ( डिसेंबर २०२५ ) तिचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. ज्ञानदाचा होणारा नवरा नेमका कोण आहे याबद्दल चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर साखरपुड्याचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिच्या अहोंची ओळख सर्वांना करून दिली.
ज्ञानदा रामतीर्थकरच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे हर्षद आत्माराम. तो सिनेमॅटोग्राफर, DOP आहे. या दोघांची पहिली भेट २०१५ मध्ये एका शॉर्ट फिल्मच्या शूटिंगदरम्यान झाली होती. यानंतर हळुहळू दोघांमध्ये छान मैत्री झाली आणि २०१९ मध्ये हर्षदने ज्ञानदाला लग्नासाठी विचारलं होतं. आता रिलेशनशिपला जवळपास सहा ते सात वर्षे पूर्ण झाल्यावर हे दोघंही लग्नबंधनात अडणार आहेत.
ज्ञानदा रामतीर्थकरने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिची लव्हस्टोरी सांगितली आहे. अभिनेत्री म्हणाली, “आमची लव्हस्टोरी हळुहळू फुलत गेली. २०१५ मध्ये आमची पहिली भेट झाली होती. हर्षद तेव्हा कायमस्वरुपी मुंबईत राहत नव्हता. तो फक्त कामानिमित्त इथे यायचा. तो इथे आल्यावर मला न भेटता गेला की, मला कसंतरी वाटायचं. ती एक प्रेमाची सुरुवात होती. पुढे, २०१९ मध्ये त्याच्या जवळच्या दोन मित्रांची लग्न होती आणि तेव्हा त्याची इच्छा होती की, मी त्याच्याबरोबर जावं. मी सुद्धा त्यांच्या लग्नाला गेले आणि त्यानंतर हा मला घरी सोडायला येत होता. त्यावेळी मला म्हणाला, ‘अगं ज्ञानदा माझ्या दोन्ही मित्रांची लग्न झाली…चल आपण सुद्धा लग्न करून टाकूया’ त्यादिवशी त्याने मला प्रपोज केलं होतं.”
हर्षद यावर म्हणाला, “ज्ञानदा माझ्यापेक्षा वयाने लहान होती. त्यामुळे आमचं ठरलं होतं की, आपण थोडा वेळ घ्यायचा.” पुढे ज्ञानदा म्हणाली, “मी २२व्या वर्षी याच्या प्रेमात पडलीये. आमच्यात ७ वर्षांचा फरक आहे. त्यामुळे त्याचं असं म्हणणं होतं की, तू वेळ घे विचार घे. पण, माझं आधीपासूनच सगळं ठरलं होतं. मग पुढे जेव्हा त्याने लग्नासाठी विचारलं तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता कारण माझं ठरलं होतं की, आपल्याला याच्याशीच लग्न करायचंय.”
हर्षद ज्ञानदाच्या स्वभावाबद्दल म्हणाला, “ती समोरच्या व्यक्तीची खूप प्रेमाने काळजी घेते. तिला सर्वांबद्दल आपुलकी वाटते. माझं असं झालेलं अरे हा स्वभाव किती छान आहे…त्यामुळे आपसूकच आमचं बॉण्डिंग झालं.”

