कलाकार म्हटलं की संघर्ष हा आलाच. कधी कोणती कलाकृती त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवेल आणि कधी कलाकृती त्यांच्या हातून जाईल याची काहीच शाश्वती नसते. अनेकदा इंडस्ट्रीत नवीन असताना कलाकारांना अचानक त्यांना प्रोजेक्ट मधून काढून टाकल्याचे वाईट अनुभव आल्याचे ते सांगताना दिसतात. असंच काहीसं झालेलं मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरबरोबर.

ज्ञानदानने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये मुख्य नायिकेच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनामध्ये कायमचं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेतून तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. परंतु, तिला खऱ्या अर्थाने मोठा ब्रेक मिळाला तो ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेमुळे. यानंतर सध्या ती याच वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. अशातच अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिला इंडस्ट्रीत नवीन असताना ऑडिशनदरम्यान आलेला एक अनुभव सांगितला आहे. ज्ञानदाने यावेळी तिला अचानक मालिकेतून रिप्लेस करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

पहिल्याच मालिकेच्यावेली ज्ञानदाला आलेला वाईट अनुभव

पहिल्यांदाच ऑडिशन दिल्यानंतर मालिकेसाठी निवड तर झाली मात्र त्याच मालिकेतून तिच्यासह इतर सर्व कलाकारांना रिप्लेस करण्यात आल्याचं तिने ‘बी द लाईट’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. ज्ञानदाला मुलाखतीत तिच्या अनुभवांबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “मला वेगवेगळे अनुभव आले आहेत. माझी सुरुवातच अशी झाली आहे की मी आयुष्यात पहिल्यांदाच ऑडिशन दिली होती ती माझ्या पहिल्या मालिकेसाठी होती आणि त्यांनी माझी निवडसुद्धा केली आमचा करारसुद्धा झाला. शूटिंग सुरू होणार होतं त्यामुळे मी माझं सामान वगैरे सगळं पॅक करत होते. तेव्हा मी २० वर्षांची होते. ती माझ्या आयुष्यातली पहिलीच ऑडिशन होती त्यामुळे पहिलीच ऑडिशन दिली आणि त्यातही माझी निवड झाली याचा आनंदच वेगळा होता. आनंदही होत होता आणि कुठेतरी ते पचतसुद्धा नव्हत.”

ज्ञानदा याबद्दल पुढे म्हणाली, “आदल्या दिवशी कळलं की मला शूटिंगला नाही जायचं तर मला मुंबईला जायचंय कारण पुन्हा सगळ्यांची ऑडिशन होणार आहे. तेव्हा मालिकेतील सगळ्या कलाकारांना रिप्लेस करण्यात आलं. तेव्हा मला असे प्रश्न पडले की मीच का, मला मालिकेतून रिप्लेस करण्यात का आलं? माझ्यामध्ये काही कमतरता आहे का? मी त्या पात्रासाठी योग्य नव्हते का?, मी चांगली दिसत नाही का? वगैरे”.

ज्ञानदा पुढे म्हणाली, “पण त्यावेळी मालिकेतील कलाकार आणि इतर लोकांमुळे इतर चार ऑडिशन्ससाठी प्रयत्न करता आले. तेव्हा पहिल्याच मालिकेच्यावेळी आपल्याबरोबर असं का झालं याचा खूप त्रास झाला आणि वाईट वाटलं, पण तिथूनच मला दुसऱ्या ऑडिशनबद्दल कळलं ती मी दिली त्यानंतर मला माझी पहिली मालिका मिळाली.”