‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील काव्या म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीच्या होणाऱ्या पतीचं नाव हर्षद असून, गेली अनेक वर्षे या दोघांमध्ये खूप छान मैत्री आहे. या दोघांची पहिली भेट २०१५ मध्ये झाली होती. तर, २०१९ मध्ये हर्षदने ज्ञानदाला थेट लग्नासाठी विचारलं होतं. याचवेळी त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती. ज्ञानदा व हर्षद यांचा साखरपुडा अलीकडेच थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला ज्ञानदाचे इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणी, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील सहकलाकार सुद्धा उपस्थित होते.

आता नुकतीच या दोघांनी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी रिलेशनशिपबद्दल घरी केव्हा कल्पना दिली याबद्दल सांगताना ज्ञानदा म्हणाली, “अर्थात सर्वात आधी हर्षदने त्याच्या घरी आमच्याबद्दल सांगितलं होतं. मी घरी सांगण्यासाठी थोडा वेळ घेतला होता. पण, जे काही सांगेन ते मीच सांगेन हे मी ५०० टक्के ठरवलं होतं. घरी कल्पना दिल्यावर त्यांच्या होकाराची वाट पाहायची हे सुद्धा आमचं आधीच ठरलं होतं आणि कुटुंबीयांचा होकार येईपर्यंत लग्न करायचं नाही हे फिक्स होतं.”

हर्षद यावर म्हणाला, “आमच्या लग्नासाठी सगळे मनापासून तयार झाले पाहिजेत, असं आम्हा दोघांचं मत होतं. अर्थात यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. मग हळुहळू सगळ्या गोष्टी जुळून आल्या.”

ज्ञानदा म्हणाली, “मुलीच्या घरच्यांसाठी लेकीचं लग्न हा क्षण किती भावनिक असतो हे आता-आता आम्हाला कळू लागलंय. कारण, साखरपुड्याला आम्ही एकमेकांच्या हातात अंगठ्या घातल्या तेव्हा माझी आई प्रचंड खूश होती. पण, माझे बाबा खूप रडत होते. त्यांना समजावून सांगण्यासाठी हर्षद पुढे गेला होता. त्या क्षणाला मला जाणवलं की, आपले बाबा आपला किती विचार करतात. त्यांना ज्यावेळी आमच्याबद्दल सांगितलं होतं, तेव्हा ते म्हणाले होते की, वेळ घे… प्रत्येक गोष्टीचा विचार कर. तुझं जेव्हा फायनल ठरेल तेव्हा आपण बोलू असं आमचं बोलणं झालं होतं. हे सगळं मला साखरपुड्याच्या दिवशी जाणवलं की, कोणत्याही आई-बाबांसाठी पटकन होकार देणं हे सोपं नाहीये. जोपर्यंत सगळे ‘हो’ म्हणत नाहीत तोपर्यंत लग्न करायचं नाही हे आमचं ठरलंच होतं. या काळात मग आम्ही दोघांनी करिअरकडे लक्ष दिलं.” आई-बाबांना लग्नासाठी होकार द्यायला दोन वर्षे लागली असंही ज्ञानदाने यावेळी सांगितलं.

“माझ्या आई-बाबांनी इतका वेळ घेतला कारण, त्यांच्या मनात बरेच प्रश्न होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आम्ही दोघं एकाच क्षेत्रात काम करतो…त्यामुळे आर्थिक नियोजन कसं असेल वगैरे हा सगळ्यात मोठा मुद्दा होता. तुमचे भविष्याबद्दल काय-काय विचार आहेत ते आम्हाला सांगा असं सगळं माझ्या आई-बाबांचं म्हणणं होतं. मग, काही दिवसांनी त्यांना आमच्या नात्याबद्दल एक विश्वास निर्माण झाला. याशिवाय हर्षद नेहमी मला माझ्या कामात सपोर्ट करतोय हे त्या दोघांनीही पाहिलंय.” असं ज्ञानदाने सांगितलं.