Dnyanada Ramtirthkar Wedding Ukhana Video Viral: मराठी लग्न म्हटलं की उखाणा आलाच, उखाण्याशिवाय लग्न पूर्णच होत नाही. खासकरून मराठी सेलिब्रिटींच्या लग्नातील उखाण्यांची विशेष चर्चा असते. बरेच सेलिब्रिटी हटके, आपल्या प्रेमाचा, नात्याचा प्रवास सांगणारे उखाणे तयार करतात. तसाच उखाणा मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिनेही तयार केलाय. तिच्या लग्नातील लूकची चर्चा होतानाच तिच्या उखाण्याने विशेष लक्ष वेधून घेतलंय.

ज्ञानदा व हर्षद गायकवाड यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नात ज्ञानदा व हर्षद यांनी खूप सुंदर लूक केला होता. लग्नात हर्षद व ज्ञानदा दोघांनीही उखाणे घेतले. यावेळी ज्ञानदाने तिची व हर्षदची लव्ह स्टोरी सांगणारा उखाणा तयार केला होता. तिच्या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ज्ञानदा रामतीर्थकरने घेतलेला उखाणा

एका शॉर्टफिल्मच्या शूटला भेटलो होतो आम्ही
तेव्हा अजिबात माहित नव्हतं हेच होणार आहेत माझे स्वामी
त्याने हातात धरलेला कॅमेरा, मी केलेली अभिनयाची निवड
कामात पुरते गुंतून गेलो, एकमेकांना भेटायला नव्हती सवड
फोन, व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल्सने जरा सोपं केलं जगणं
आता तुझा पॅकअपनंतरचा वेळ माझा, हेच होतं दोघांचंही मागणं
काम करत राहिलो, एकमेकांना समजून घेतलं
कसं-कधी कळलंच नाही पण हे लाँग डिस्टन्स प्रेम फुलत गेलं
तो होता पुण्यात, मी होते मुंबईत, मग आठवण यायला लागली
त्या आठवणीनेच बहुतेक प्रेमाची गाठ अजून घट्ट झाली
सतत सांगत राहिलो एकमेकांना कामावर फोकस कर
योग्य वेळ आल्यावर होणारच आहोत आपण एकमेकांचे वधु-वर
आता कळतंय त्यावेळी एकमेकांना केलेला सपोर्टच महत्त्वाचा होता
डोळे भरून येतात, ते सगळं मागे वळून बघता बघता
आता त्याचा कॅमेरा, लाइट्स अन् फोकसला मी सुद्धा समजून घेतलंय
माझ्या आयुष्यातील अभिनयाच्या रसांना त्यानेही आपलंसं केलंय
आज लग्न झालंय आमचं, इथून पुढे आमच्या प्रेमात होत राहिल सगळी
हर्षदरावांचं नाव घेते, माझं पूर्ण नाव ऐका- ज्ञानदा हर्षदराव गायकवाड,
असा उखाणा ज्ञानदाने घेतला.

ज्ञानदा रामतीर्थकरचा हा उखाणा ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडात केला. त्याचबरोबर चाहत्यांनाही त्यांच्या नात्याचा प्रवास सांगणारा हा उखाणा फार आवडला आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी आघाडीची मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने आता आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. ज्ञानदा आणि हर्षद आत्माराम यांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. आपल्या आयुष्यातील या महत्त्वाच्या दिवसासाठी ज्ञानदाने एक अतिशय सुंदर, गुलाबी रंगाची पारंपरिक साडी परिधान केली होती; तर हर्षद पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये अत्यंत रुबाबदार दिसत होता. या जोडप्याचे लग्नातील पहिलेच फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.