Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. येत्या रविवारी १९ एप्रिलला या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. सध्या घरात एकूण ६ स्पर्धक आहे. तन्वी कोलते, राकेश बापट, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, अनुश्री माने आणि रेवा कौरासे यांचा यामध्ये समावेश आहे. फिनालेपूर्वी घरात मिड-वीक एव्हिक्शन सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सध्या सगळ्याच सदस्यांचे चाहते प्रेक्षकांना व्होटिंगसाठी आवाहन करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा फायनलिस्ट धनंजय पोवार म्हणजेच सर्वांच्या लाडक्या DP दादाने सुद्धा यासंदर्भात एक खास पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर सध्या तन्वी कोलते, राकेश बापट यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण, अशातच धनंजयने अनुश्री मानेला व्होट करण्याचं आवाहन प्रेक्षकांसह इन्फ्लुएन्सर्स मंडळींना केलं आहे.

धनंजय पोवार म्हणतो, “सोशल मीडियावर गेल्यावर्षी भरपूर लोकांनी मला प्रेम दिलं. सूरज चव्हाण, मला, अंकिताला खूप सपोर्ट मिळाला…आम्ही टॉप-५ मध्ये पोहोचलो. आमच्या सीझनमध्ये सूरज चव्हाण तुम्हा सगळ्या प्रेक्षकांमुळेच हा शो जिंकू शकला. यावर्षी सुद्धा तुम्हा प्रेक्षकांकडे अशीच एक संधी आहे.”

इंडस्ट्रीतले लोक कलाकारांनाच सपोर्ट करतात त्यामुळे…

“ज्याप्रकारे इंडस्ट्रीतले लोक शोमध्ये जे कलाकार आहेत फक्त त्यांना सपोर्ट करतात. मी इंडस्ट्रीतल्या लोकांना कधीच इन्फ्लुएन्सर्सना पाठिंबा देताना पाहिलेलं नाहीये…अर्थात माझं हे मत खरं किंवा खोटंही असू शकतं. पण, आज मला मनापासून असं वाटतंय की, अनुश्रीच्या पाठिशी सर्वांनी उभं राहायला पाहिजे. अनुश्रीबद्दलचे हेवेदावे बाजूला ठेवा…तिच्याबद्दल तुमच्या मनात जे काही मतभेद आहेत…ते सुद्धा बाजूला ठेवा. पण, आता काही मोजकेच तास बाकी आहेत. आज आपल्याला अनुश्रीसाठी एकत्र यावं लागणार आहे. तिला आपण व्होट देऊयात. मला असं वाटतं अनुश्रीने हा शो जिंकावा. तुम्ही सुद्धा यावर विचार करा आणि तिला पाठिंबा द्या. यावर्षी सुद्धा एक इन्फ्लुएन्सर जिंकला पाहिजे…सगळे मतभेद विसरून तिला पाठिंबा द्या.”

दरम्यान, आता १९ एप्रिलला ग्रँड फिनालेच्या दिवशी कोणता सदस्य बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.