काही महिन्यांपूर्वी ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘शिवा’ मालिका सुरू झाली. १२ फेब्रुवारीपासून ‘शिवा’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार होती. पण ऐनवेळी मालिकेचं प्रेक्षपण रखडलं. १२ फेब्रुवारीला रात्री ९ वाजता ‘शिवा’ मालिकेच्या पहिल्या भागाचं प्रेक्षपण तांत्रिक कारणामुळे झालंच नाही. यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला आणि नाराजीचे वातावरण पसरलं होतं. एवढी मोठी चूक कशी काय झाली? अशी विचारणा नेटकऱ्यांकडून होऊ लागली होती. पण हिच मोठी चूक पुन्हा एकदा अभिनेत्री श्रुती मराठेच्या नव्या मालिकेकडून झाली आहे.

अभिनेत्री श्रुती मराठे व तिचा पती अभिनेता गौरव घाटणेकर यांची निर्मिती संस्था ‘ब्लॅक कॉफी प्रोडक्शन’ची नवी मालिका ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ ही १० जूनपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार होती. या मालिकेत अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे व अभिनेता गौरव घाटणेकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ‘तुजवीण सख्या रे’ या गाजलेल्या मालिकेनंतर गौरव मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळेच ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ ही नवी मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत होती. पण पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे.

हेही वाचा- Video: हनिमूनला गेलेल्या गोविंदाच्या भाचीचा ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाण्यावर हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल

तांत्रिक कारणामुळे ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ मालिकेच्या पहिला भागाचं प्रेक्षपण होऊ शकलं नाही. त्यामुळे यादरम्यान अभिनेता सुबोध भावे व अभिनेत्री शिवानी सोनारची ‘तू भेटशी नव्याने’ या नव्या मालिकेची वेळ जाहीर करण्यात आली. पण प्रेक्षकांचा हिरमोड झाल्यामुळे वाहिनीकडून माफी मागितली गेली.

‘सोनी मराठी’च्या सोशल मीडियावर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून प्रेक्षकांची माफी मागितली गेली. “नमस्कार काही तांत्रिक कारणांमुळे ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ मालिकेचा आजचा पहिला भाग प्रसारित होऊ शकला नाही. याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. पाहा ही नवीकोरी गोष्ट, उद्यापासून रात्री ८ वाजता सोनी मराठीवर”, अशा आशयाची पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

हेही वाचा – मुनव्वर फारुकीने दुसऱ्या लग्नावर केलं शिक्कामोर्तब, पत्नी व मुलांसह केली पिझ्झा पार्टी, फोटो व्हायरल

दरम्यान, ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ मालिकेत अनुष्का बोऱ्हाडे लक्ष्मीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर गौरव घाटणेकर हर्षवर्धनच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता ही नवी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडते की नाही? हे येत्या काळातच स्पष्ट होईल.