Eijaz Khan on Marriage and Kids: अभिनेता एजाज खान ५० वर्षांचा झाला आहे. एजाज खान जवळपास दोन वर्षापासून पवित्रा पुनियाबरोबरच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस १४’ च्या घरातून सुरू झालेली ही प्रेमकहाणी अखेर संपुष्टात आली आहे. पवित्रा आयुष्यात पुढे गेली असून लवकरच अमेरिकेतील एका बिझनेसमनशी लग्न करणार आहेत. तर दुसरीकडे, एजाजने आता लग्न, मुलं याबद्दल त्याचं मत मांडलं आहे.
एजाज आणि पवित्रा यांची भेट ‘बिग बॉस १४’ मध्ये झाली होती. सुरुवातीला त्यांच्यात खूप भांडणं झाली, पण हळूहळू त्याचं रूपांतर प्रेमात झालं. शोमधून बाहेर आल्यानंतर ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. २०२२ मध्ये त्यांनी अधिकृतपणे साखरपुडा केल्याचं जाहीर केलं होतं आणि २०२४ मध्ये ते लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या.
फेब्रुवारी २०२४ मध्ये या जोडीने अधिकृतपणे नातं संपल्याचं सांगितलं. एजाजने एका मुलाखतीत म्हटलं की, “काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आम्ही एकमेकांचा आदर करतो, पण आमचे मार्ग आता वेगळे झाले आहेत.” त्यांच्यातील वैचारिक मतभेद आणि भविष्यातील प्लॅनिंगमधील तफावत हे ब्रेकअपचे मुख्य कारण होते, असं म्हटलं जातं.
लग्न किंवा मुलांचा विचार करत नाही – एजाज खान
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एजाज खानने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे. एजाज म्हणाला की, सध्या त्याच्या आयुष्यात लग्नासाठी कोणतीही जागा नाही. तो आता सिंगल राहून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू इच्छितो. सध्या तो मुलांचा किंवा कुटुंब वाढवण्याचा विचार करत नाहीये. त्याच्या मते, एका नात्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतःला सावरणं आणि करिअरला प्राधान्य देणं हे त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.
“मी आता आयुष्यातील अशा वळणावर आहे, जिथे मला स्वतःची प्रगती आणि मानसिक शांतता हवी आहे. नातेसंबंधांच्या गुंत्यात अडकण्याची माझी आता मानसिक तयारी नाही,” असं एजाज खानने नमूद केलं.
दरम्यान, एजाज खान सध्या आपल्या अभिनयावर लक्ष केंद्रित करत आहे. जवान चित्रपटातील त्याच्या भूमिकेनंतर त्याला मोठ्या पडद्यावर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगल्या संधी मिळत आहेत. तो सध्या आपल्या फिटनेसवर आणि आगामी प्रोजेक्ट्सवर काम करण्यात व्यग्र आहे.
एजाज खानचे अफेअर
एजाजच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास अभिनेत्री अनिता हसनंदानीबरोबर तो नात्यात होता. ‘काव्यांजली’ या मालिकेच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेक वर्षे डेट केल्यानंतर २०१० मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. एजाजने नंतर कबूल केलं होतं की, त्याने अनिताची फसवणूक केल्यामुळे हे नातं तुटलं. अनितासोबतच्या ब्रेकअपनंतर एजाज इटालियन-कॅनेडियन गायिका नताली डी लुसिओला डेट करत होता. ते बराच काळ एकत्र होते, परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे हे नातंही टिकू शकलं नाही. नंतर एजाजच्या आयुष्यात पवित्रा पुनिया आली होती.
