Ekta Kapoor Serial Off Air : प्रसिद्ध निर्माती एकता कपूरने तिच्या ‘नागिन ७’ मालिकेबद्दलची महत्त्वाची अपडेट दिली आहे. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तिची कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘नागिन ७’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका कधी संपणार, याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. पण आता स्वतः एकतानेच यावर शिक्कामोर्तब केले आहे.

‘नागिन ७’ सुरू झाल्यापासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावले होते. ‘नागिन ७’ ने ‘अनुपमा’ आणि ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी २’ सारख्या लोकप्रिय मालिकांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र, हळूहळू या मालिकेचा टीआरपी घसरू लागला. अखेर टीआरपीमधील घसरण पाहून निर्मात्यांनी ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘नागिन ७’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

एकताने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती ‘नागिन ७’ च्या टीमबरोबर दिसत होती. यावेळी तिने सांगितले की, ‘नागिन ७’ लवकरच ऑफ एअर होणार आहे. विशेष म्हणजे, एकताने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल, असे स्पष्ट केले आहे.

व्हिडीओमध्ये बोलताना एकता म्हणाली, “नेहमीप्रमाणे मी तुम्हाला ‘नागिन’बद्दल अपडेट देण्यासाठी आले आहे. खरंतर हा शो एप्रिलमध्येच संपणार होता, पण चॅनेलच्या विनंतीमुळे आता तो माझ्या वाढदिवसाच्या दिवशी संपेल. नागिनचा कोणताही सीझन इतका मोठा असेल, असं आम्हाला वाटले नव्हते. केवळ ३० भागांचे नियोजन होते, पण आम्ही ते ४० भागांपर्यंत नेले आणि आता पुढच्या वर्षी आम्ही पुन्हा नवीन सीझन घेऊन येऊ.”

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘नागिन ७’चा शेवटचा भाग

वृत्तांनुसार, आता ‘नागिन ७’ चे फक्त ८ भाग शिल्लक आहेत. एकता कपूरचा वाढदिवस ७ जून रोजी असतो, त्यामुळे या मालिकेचा शेवटचा भाग ७ जूनला प्रसारित केला जाईल. ‘नागिन ७’ चा पहिला भाग २७ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता. पण आता सहा महिन्यांनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

मालिका संपण्यापूर्वी प्रेक्षकांना यात अनेक नवीन कलाकारांची एन्ट्री आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतील. इतकेच नाही, तर कथानकात लवकरच एक मोठा ‘लीप’ देखील दाखवला जाणार आहे. दरम्यान, एकताने मालिका संपणार असल्याच्या घोषणा करताच चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही प्रेक्षक ‘नागिन ७’ बंद होत असल्यामुळे नाराज आहेत, तर काहींनी एकताच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले आहे.