अभिनेत्री दीपिका कक्करवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिला कर्करोगाचं निदान झाल्याचं अभिनेत्रीने सांगितलं होतं. दीपिकाला स्टेज २ लिव्हर कॅन्सर असल्याचं तिने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं होतं. अशातच आता शस्त्रक्रियेनंतर तिचा नवरा शोएब इब्राहिमने यूट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दीपिका भावूक होत तिच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानताना दिसली.

शोएबने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दीपिका म्हणाली, “यावेळी मला एवढंच म्हणायचं आहे की, तुम्ही सर्वांनी खूप प्रार्थना केल्या, त्यासाठी धन्यवाद. रुग्णालयातही तेथील कर्मचारी, नर्स, तसेच इतर बरेच लोकं येऊन सांगत होते की तुम्ही बऱ्या व्हाल. दुसऱ्या पेशेंटचे नातेवाईक येऊन आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत असं म्हणत होते. त्यांची स्वत:ची मुलं, वडील होते पण तरीसुद्धा त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. या सर्व गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात. मला खूप बरं वाटत आहे, माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.”

दीपिकासह या व्हिडीओमध्ये तिचा मुलगा रुहानसुद्धा पाहायला मिळाला. दीपिकावर सुरू असलेल्या उपचारादरम्यान शोएबचे कुटुंबीय तिला पाहण्यासाठी रुग्णालयामध्ये गेल्याचं यामधून दिसत आहे. नुकतंच शोएबने सांगितलं की, दीपिकाच्या पोटात असलेला टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर व तिच्या यकृताचा छोटा भाग शस्त्रक्रियेदरम्यान काढण्यात आला.

शोएबने यापूर्वी शेअर केलेल्या व्हिडीओमधून दीपिकावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्या प्रकृतीबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला होता, “दीपिकावर शस्त्रक्रिया झाली असून, ती जवळपास १४ तास ओटीमध्ये होती. सुदैवानं सगळं सुरळीत पार पडलं. पूर्वीपेक्षा आता तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थना आणि पाठिंब्यासाठी मी तुमचे आभार मानतो”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपिकाने २८ मे रोजी तिला कर्करोगाचं निदान झाल्याचं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सांगितलं होतं. तिने लिहिलं होतं, “जसं की तुम्हाला माहीत आहे गेले काही दिवस आम्ही कठीण परिस्थितीतून जात आहोत. पोटात होत असलेल्या त्रासामुळे रुग्णालयामध्ये गेले असताना माझ्या यकृतामध्ये टेनिस बॉलच्या आकाराच ट्यूमर आढळला आणि समजलं की मला स्टेज २ लिव्हर कॅन्सरचं आहे, आमच्यासाठी हा काळ प्रचंड कठीण होता.”