Esha Dey- Abhishek Khankar LoveStory : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री ईशा डे ११ मार्च २०२६ रोजी लग्नबंधनात अडकली. ईशाने लेखक-गीतकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक खणकरशी लग्नगाठ बांधली आहे. या दोघांचा विवाहसोहळा पाचगणीत पार पडला. या दोघांची लव्हस्टोरी सुद्धा तेवढीच फिल्मी आहे. ईशा आणि अभिषेक यांची पहिली भेट साधारण १५ वर्षांपूर्वी अभिनेत्री कॉलेजमध्ये असताना झाली होती. यानंतर मध्यंतरीच्या काळात दोघांचाही एकमेकांशी काहीच संपर्क नव्हता. पण, त्यानंतर हास्यजत्रेचं एक स्किट पाहून अभिषेकने ईशाला मेसेज केला होता. यांची फिल्मी लव्हस्टोरी नेमकी कशी आहे पाहुयात…

ईशा डे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “अभिषेक माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे. मी ज्या एकांकिकेत काम करत होते, त्याचं म्युझिक अभिषेक करत होता. पाहताच क्षणी मला तो आवडला होता आणि ही गोष्ट माझ्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा माहीत होती. मी धाडसाने त्याचा फोन नंबर मिळवून त्याला फोन केला होता आणि त्याला थेट सांगितलं होतं ‘तू मला आवडतोस’! त्यानंतर त्याने मला सल्ला दिला की, तू आताच कॉलेजमध्ये आली आहेस, लगेच प्रेमात पडू नकोस. कॉलेजमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या शिकून घे, एक्सप्लोर कर.”

कॉलेज संपल्यावर या दोघांचा काहीच संपर्क नव्हता. या दोघांचाही वाढदिवस एकाच तारखेला असतो. म्हणून ईशा आणि अभिषेक वाढदिवसाच्या दिवशी एकमेकांना फक्त ‘सेम टू यू’ म्हणायचे. इतकंच काय ते दोघांमध्ये बोलणं व्हायचं. यानंतर एके दिवशी अभिषेकने ईशाचं हास्यजत्रेतील एक स्किट पाहिलं आणि तिला मेसेज केला.

पुढे सांगताना ईशा म्हणाली, “गेल्यावर्षी त्याने माझं हास्यजत्रेतील एक स्किट पाहिलं. तो हास्यजत्रेचा फॅन आहे…त्या स्किटमध्ये मी एक गाणं गायलं होतं. ते पाहून अभिषेकने मला मेसेज केला होता. ‘बरं गातेस की…’ त्यानंतर मग आमचं बोलणं सुरू झालं. आम्ही रोज बोलू लागलो.” यानंतर दोघांनीही लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

…म्हणून ११ मार्चला लग्न केलं!

११ मार्च २०२५ रोजी हे दोघं पहिल्यांदा मेसेजवर बोलले होते. त्यानंतर १४ मार्चला दोघांची पहिली भेट झाली. ज्यादिवशी दोघं पहिल्यांदा भेटले त्याच दिवशी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच यावर्षी ११ मार्चलाच ईशा-अभिषेक लग्नबंधनात अडकले.