Eva Grover Personal Life: टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री इव्हा ग्रोव्हर सध्या तिच्या एका खळबळजनक मुलाखतीमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. ‘शरारत’ आणि ‘ऑफिस ऑफिस’ सारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या इव्हाने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत. आमिर खानचा सावत्र भाऊ हैदर अली खान याला अवघे १८ दिवस डेट केल्यानंतर इव्हाने घरून पळून जाऊन लग्न केले होते. मात्र, लग्नानंतरच्या तिसऱ्याच दिवसापासून तिला झालेल्या त्रासाची कल्पनाही कोणी करू शकत नाही. हैदरला ‘स्किझोफ्रेनिया’ हा गंभीर मानसिक आजार होता, ज्यामुळे तो इव्हाला प्रचंड त्रास द्यायचा.

इव्हाने आमिर खानचा सावत्र भाऊ हैदर अली खान याला फक्त १८ दिवस डेट केलं होतं आणि त्यानंतर त्याच्याबरोबर पळून जाऊन लग्न केलं होतं. खासगी क्षणांमध्ये पती मारहाण करायचा आणि त्यासाठी ती स्वतःलाच दोष द्यायची, असा धक्कादायक खुलासा इव्हाने केला. हैदर अलीला ‘स्किझोफ्रेनिया’ हा मानसिक आजार होता, असंही तिने सांगितलं.

त्याचा धर्म वेगळा असल्याने आई स्वीकारणार नव्हती

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत इव्हा म्हणाली, “एका मित्राद्वारे मी हैदर अली खानला भेटले. तो कतार एअरवेजमध्ये केबिन क्रू म्हणून काम करायचा आणि चांगलं कमवायचा. मी अभिनेत्री होते, त्यामुळे महिन्याच्या शेवटी माझ्याकडेही चांगले पैसे यायचे. माझे बँक बॅलन्स चांगले होते, आम्हा दोघांनाही पैशांची कोणतीही कमतरता नव्हती. पण त्याचा धर्म वेगळा होता आणि माझी आई त्याला कधीच स्वीकारणार नव्हती. त्यामुळे फक्त १८ दिवस डेट केल्यानंतर त्याने मला प्रपोज केले, तेव्हा मी खूप खूश होते.”

हैदरबरोबर पळून जाऊन इव्हाने केला निकाह

इव्हा पुढे म्हणाली, “मी त्याच्या प्रेमात वेडी झाले होते, कोणताही विचार न करता मी त्याच्यासोबत पळून गेले, आम्ही ‘निकाह’ केला आणि मी कधीही मागे वळून पाहिलं नाही. या निर्णयामुळे माझी आई खूप दुखावली. ती मला म्हणाली होती की, ‘आता तुझ्यासोबत काहीही झालं तरी या घरात परत येऊ नकोस.’ माझी आई तिच्या जागी बरोबर होती. कदाचित हे लग्न टिकलं असतं तर तिने स्वीकारलं असतं, पण तसं झालं नाही.”

इव्हाने सांगितलं की हैदर खूप दारू प्यायचा आणि दोहामध्ये राहायचा. तो दिसायला चांगला असल्यामुळे त्याला इंडस्ट्रीत खूप काम मिळू शकतं असं वाटू लागलं. त्यामुळे त्याने आपली नोकरी सोडून दिली. नोकरी सोडल्यामुळे त्याची चिडचिड वाढली. त्याला आधीपासूनच स्किझोफ्रेनिया होता, जो हळूहळू आणखी वाढत गेला.

मारहाण करायचा हैदर

इव्हा म्हणाली, “इंटिमेट होताना मला मारहाण करण्यात त्याला आनंद मिळायचा. ही त्याची जुनीच सवय होती, पण लग्नाआधी मला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी मला हे समजलं आणि पुढे त्याचं मारहाण करणं खूप वाढत गेलं. बरीच वर्षे मी स्वतःलाच या सर्व गोष्टींसाठी जबाबदार धरत होते, मला वाटायचं की माझ्यामध्येच काहीतरी कमतरता आहे.”

इव्हा ग्रोवरने सांगितलं की तिने हे लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. तिला एक मुलगी झाली, तिला वाटलं की मुलीच्या जन्मानंतर हैदर सुधारेल पण तसं काहीच घडलं नाही, मुलीलाही या सगळ्याचा त्रास सहन करावा लागला. शेवटी तिने तिची चूक स्वीकारली आणि हैदरला सोडायचा निर्णय घेतला. त्याच्यापासून विभक्त झाल्यावर मुलीला घेऊन ती कायमची आईकडे निघून गेली.