Famous child artist Jhanak Shukla Career: काही शो हे कायमच लक्षात राहतात. त्यातीलच ‘करिश्मा का करिश्मा’ हा एक शो आहे. या शोमधील पात्रे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेत करिश्मा हे पात्र झनक शुक्लाने साकारले होते. झनकच्या या पात्राला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. मात्र, ती सध्या अभिनय क्षेत्रात नाही तर एका वेगळ्याच क्षेत्रात करिअर करत आहे.

झनक ही लोकप्रिय अभिनेत्री सुप्रिया शुक्ला यांची मुलगी आहे, तर तिचे वडील प्रोडक्शन विभागात काम करतात; तरीही झनक सध्या लाईमलाईटपासून दूर आहे.

झनक शुक्ला सध्या काय करते?

झनकच्या अभिनय क्षेत्रातील कारकि‍र्दीबद्दल बोलायचे तर हा कालावधी कमी आहे. तिने अगदी लहान वयात या क्षेत्रात पाऊल ठेवले होते आणि लहान वयातच ती या क्षेत्रापासून दूर झाली.

एका मुलाखतीत झनकने तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगितले होते. ती म्हणालेली, “माझं पहिलं ऑडिशन एका जाहिरातीसाठी झालं होतं. मी तेव्हा पाच वर्षांची होते. त्या ऑडिशनमध्ये मला रडायला सांगितलं. मला ते सहज जमत होतं. त्या ऑडिशनमध्ये माझी निवड झाली. मला पहिली जाहिरात मिळाली. प्रदीप सरकार यांच्याबरोबर माझी पहिली जाहिरात होती. त्यानंतर मला आणखी काही जाहिरातींमध्ये काम मिळालं. मग मालिकांमध्ये काम मिळालं. त्यानंतर चित्रपटातही मला काम मिळालं.”

ती असेही म्हणालेली, “हे सगळं फक्त दोन वर्षांत घडलं. मी ४–५ वर्षांची होते, फक्त एक-दोन वर्ष काम केलं आणि मग अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. कारकीर्द मोठी नव्हती, पण लक्षात राहणारी होती.”

‘कल हो ना हो’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची आठवण सांगत झनक म्हणालेली, “आम्ही प्रीटी वुमन गाण्याचे शूटिंग करत होतो, त्यावेळी ब्रेकदरम्यान शाहरुख खानने डान्सर्सना माझ्याबद्दल सांगितलं. तो म्हणालेला की, तुम्हाला माहिती आहे ही कोण आहे? ही भारतातील स्टार आहे. तिची ‘करिश्मा का करिश्मा’ मालिकेतील भूमिका गाजत आहे, मी तेव्हा सहा वर्षांची होते. शाहरुखने तसे म्हटल्यानंतर मी लाजले होते. तो क्षण खूपच खास होता.” कल हो ना हो चित्रपटात शाहरुख खान, जया बच्चन आणि प्रीती झिंटा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.

सुप्रिया शुक्ला यांनी झनकच्या अभिनय क्षेत्रातील कारकि‍र्दीबद्दल, बालपणात अभिनयाकडे वळण्याबद्दल वक्तव्य केले होते. त्या म्हणालेल्या, “मला तिला अभिनय क्षेत्रात काम करू द्यायचे नव्हते. ती फक्त सहा वर्षांचे होती, पण आम्ही काही अटी ठेवल्या. शूटिंगचा वेळ मर्यादित असावा. मध्ये सुट्टी असावी आणि सेटवरील वातावरण चांगले असावे. मी असेही स्पष्ट केले होते की, ती जर कधी नाही म्हणाली तर तिचे शूटिंग थांबवू. एका वर्षानंतर तसं घडलंही. ती एक दिवस म्हणाली की मला शूटिंगसाठी जायचं नाही. मला खूप झोप येत आहे. तेव्हाच आम्हाला कळलं की आता थांबायची वेळ झाली आहे.” ‘करिश्मा का करिश्मा’ या शो दरम्यान झनकने अभिनयात काम न करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर झनकने पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. आज ती उच्चशिक्षित असून तिने पुरातत्वशास्त्रामध्ये पदव्युत्तर(MA in Archaeology) शिक्षण घेतले आहे. तसेच, एमबीएम(MBM), MSc in Marketing मध्येही शिक्षण पूर्ण केले आहे.

सुप्रिया शुक्ला मुलीच्या करिअरबद्दल म्हणालेल्या, “तिने प्रसिद्धी पाहिली आहे आणि आता ती शिक्षित आहे, तिला अभिनयाची उणीव कधी वाटली नाही.”