टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला मालिकेच्या सेटवर गळफास घेत जीवन संपवलं. तिच्या आत्महत्येच्या तीन दिवसांनी म्हणजेच २७ डिसेंबरला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबीयांसह मित्र-मैत्रिणींनाही धक्का बसला आहे. तुनिषा आत्महत्या प्रकरणात सध्या तिचा सह-कलाकार आणि बॉयफ्रेंड शिझान खान पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज म्हणजेच FWICE ने प्रतिक्रिया दिली आहे.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार तुनिषा शर्माच्या प्रकरणानंतर FWICEचे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. “फेडरेशन निर्मात्यांना एक पत्र लिहित आहे. जेणेकरून अशा कृत्यांना प्रोत्साहन मिळणार नाही. आता तुम्ही त्या शोचा विचार करा, त्यातील हिरोईनने आत्महत्या केली, हिरोला अटक झाली आहे, सेट बनून तयार झाला आणि शूटिंग थांबलं आहे. तो मालिकेचा आतापर्यंतचा सर्वात महागडा सेट आहे. अशा परिस्थितीत निर्मात्याचं काय झालं असेल, याचाही विचार करणं आवश्यक आहे. तुनिषाच्या आत्महत्येमुळे एक निर्माता अक्षरशः संपला आहे. तो लोकांना कामाचे पैसे कसा देईल, त्याच्यावर किती कर्ज होईल, हे सांगता येत नाही,” असंही तिवारी म्हणाले.
Video: तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तिला शिझाननेच नेलेलं रुग्णालयात; CCTV फुटेज आलं समोर
निर्मात्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या बीएन तिवारी यांनी तुनिषाच्या मृत्यूबद्दलही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “फेडरेशन याआधीही मालिकेच्या सेटवर जात असे. कलाकार आणि क्रूशी बोलायचे आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. पण आज ती परिस्थिती राहिली नाही, आम्ही सेटवर जाणं बंद केलं आहे आणि लोक इथे आपापल्या मर्जी प्रमाणे वागत आहेत. तुनिषाबरोबर जे घडले ते दुःखद आहे, पण पुन्हा असे काही होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे,” असं बीएन तिवारी यांनी म्हटलंय.
तिवारी पुढे म्हणाले “मेकअप रूममध्ये जास्त जागा नसते, त्यामुळे तिथं कोणी आत्महत्या कशी करू शकते. शिवाय सेटवर इतके लोक उपस्थित होते, त्यांना एवढ्या मोठ्या घटनेबद्दल माहिती कशी मिळाली नाही, त्यांना शंका कशी आली नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. लोकांचा कामाशिवाय एकमेकांशी संबंध उरलेला नाही, त्यामुळे असं घडतंय,” असं मत बीएन तिवारी यांनी व्यक्त केलं.
पुढे ते म्हणाले, “निर्मात्यासोबतच्या भेटीदरम्यान आम्ही त्यांना सांगू की पैसे कमवणे हे त्यांचे एकमेव ध्येय असू नये. तुम्ही तुमच्या टीमच्या मानसिक आरोग्याचा विचार केला पाहिजे. मीटू दरम्यान, सेटवरील लैंगिक छळ यासारख्या गोष्टी दूर करण्यासाठी आम्ही एक टीम तयार केली आणि यावेळी आम्ही प्रत्येक सेटवर एक समुपदेशक असावा असा प्रस्ताव मांडणार आहोत. मुलांचे समुपदेशन खूप महत्वाचे आहे. आताच्या काळात मुलांना अचानक पैसे मिळतात, त्यांना आयुष्यात काय करायचे ते समजत नाही. त्यामुळे प्रत्येक समुपदेशकाला कलाकाराच्या वैद्यकीय अहवालाची माहिती असणे आवश्यक आहे. त्यांनी वेळोवेळी शूटिंगची वेळ आणि ताणतणावाची माहितीही ठेवली पाहिजे. तुनिषाच्या आत्महत्येने आम्हाला खरोखरच घाबरवले आहे. अशा घबराटीच्या वातावरणात काम कसं होणार?” असा सवालही त्यांनी केला.
“मला ‘अली बाबा’ मालिकेच्या सेटवर काम करणाऱ्या अनेक मजुरांचे फोन आले आहेत. त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता आहे. एका सेटवर शेकडो लोक काम करतात. या घटनेनंतर त्यांचं काय होणार, याबाबत आम्ही प्रॉड्यूसर्स असोसिएशनशी बोलणार आहोत. कारण सध्या सेट आणि शोचे भवितव्य अंधारात असल्याचे दिसत आहे,” असंही बीएन तिवारी यांनी सांगितलं.