मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते निळू फुले यांची कन्या गार्गी फुले-थत्ते यांनी काही वर्षांपूर्वी मालिकाविश्वातून स्वेच्छा निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली होती. आजवर ‘तुला पाहते रे’, ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘इंद्रायणी’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ अशा बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे गार्गी फुले यांनी अचानक हा स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय का घेतला याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
गार्गी फुले ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत स्वेच्छा निवृत्तीबद्दल म्हणाल्या, “माझं एक ऑपरेशन झालं होतं…त्यामुळे त्या सगळ्या समस्या होत्याच. पण, याशिवाय २०१६ ते २०२६ असे सलग दहा वर्षं मी काम करत होते…यादरम्यान मध्ये एकदाही गॅप किंवा १५ दिवसांची सुट्टीही घेतली नव्हती. त्यामुळे हा सगळा तणाव होता. याशिवाय वय हा सुद्धा एक मुद्दा होता. शारीरिकदृष्ट्या मला खरंच हे सगळं जमत नव्हतं कारण, माझं घर पुण्यात होतं. त्यामुळे एकंदर तारांबळ होत होती. माझा मुलगा दहावी-बारावीत असताना मी त्याच्याबरोबर पूर्णवेळ नव्हते..मी सतत कामानिमित्त बाहेर असायचे. पण, माझा नवरा…खरंच मी त्याला थँक्स बोलेन. त्याने सिंगल फादरप्रमाणे आमच्या मुलाची काळजी घेतली. तेव्हा मग मला वाटलं की, आता आपण कुठेतरी थांबायला पाहिजे.”
अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “याशिवाय मालिकांमध्ये फक्त बाहुली होणं हे मला मान्य नव्हतं. इंटरेस्टिंग रोल आले असते तर मी नक्कीच केले असते पण, त्याकाळात मला अशा चांगल्या भूमिका ऑफर झालेल्या नव्हत्या. दहा जण उभे आहेत..त्यात मी एक उभी आहे. तेव्हा मला कुठेतरी वाटलं आता आपण थांबलं पाहिजे. त्यामुळे मधली दीड वर्षे मी काहीच काम केलं नाही. यादरम्यान मी माझं १३ किलो वजन कमी केलं…बऱ्यापैकी बारीक झाले. कारण, मला एक ऑपरेशन करायचं होतं आणि माझ्या आधीच्या वजनात ते ऑपरेशन करणं रिस्की होतं असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. म्हणूनच मी स्वत:कडे, माझ्या घराकडे लक्ष दिलं. मुलाची बारावी होती त्याकडे लक्ष दिलं.”
“यानंतर मला जगदंब प्रोडक्शनकडून फोन आला. सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांच्यावर आधारित मालिका होती..त्यामुळे याला नकार देणं शक्यच नव्हतं. मग मी पुन्हा ही सुरुवात केली. जरी आपण कुटुंबात रमलो…तरी मग एका क्षणानंतर आपल्याला आपलं काम आठवू लागतं. त्यामुळे रिटायरमेंट म्हणणं चुकीचं आहे हे मला आता समजलंय. दीड वर्ष मी मालिकाविश्वाला, चित्रपटसृष्टीला मिस केलं. आता इथून पुढे सिलेक्टिव्ह काम करेन.” असं गार्गी फुले यांनी स्पष्ट केलं आहे.
