Prajakta Mali on Favorite Co-Star : आपल्या सहजसुंदर अभिनयाने, निखळ हास्याने अन् मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. मालिका, सिनेमे, ओटीटीवरील सीरिज तसेच रिअॅलिटी शोज मधून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरसुद्धा तितकीच सक्रीय असते. ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या अनेक स्टायलिश फोटोंना चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो. सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. विविध माध्यमांतून प्राजक्ता आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच नुकतेच तिने इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तरांच्या सेगमेन्टद्वारे चाहत्यांशी संवाद साधला.
इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तरांच्या सेगमेंटमध्ये प्राजक्ताला चाहत्यांनी अनेक प्रश्नं विचारली. अभिनेत्रीनेसुद्धा या सर्वच प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. त्यात एका चाहत्याने तिला कोड्यात टाकणारा प्रश्न विचारला. तो म्हणजे, “गश्मीर महाजनी, अंकुश चौधरी आणि ललित प्रभाकर… यांपैकी तुझा आवडता सहकलाकार कोण?” यावर प्राजक्तानेसुद्धा हटके उत्तर दिलं. चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना प्राजक्ताने कोणत्याच अभिनेत्याचे नाव घेतलं नाही. याउलट तिने फक्त “तुम्हीच ओळखा” असं उत्तर दिलं. त्यामुळे प्राजक्ताचे अनेक चाहते तिचा आवडता सहकलाकार कोण आहे, या उत्तराच्या शोधात आहेत.
दरम्यान, प्राजक्ताने गश्मीर महाजनी, ललित प्रभाकर आणि अंकुश चौधरी या तिन्ही अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. तिने ललितबरोबर ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेत काम केले आहे. या जोडीला प्रेक्षक अजूनही मिस करतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर प्राजक्ताने अंकुश चौधरीबरोबर ‘लकडाऊन बी पॉसिटीव्ह’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या दोघांच्या जोडीलासुद्धा प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. तसेच ‘फुलवंती’ या गाजलेल्या चित्रपटात प्राजक्ता आणि गश्मीर यांची जोडी पहायला मिळाली होती. या चित्रपटातील दोघांच्या केमिस्ट्रीलासुद्धा प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.

प्राजक्ता ही केवळ एक अभिनेत्रीच नव्हे; तर व्यावसायिकासुद्धा आहे. तिचं स्वत:चं फार्महाऊस आहे. त्याचबरोबर तिचा स्वत: ज्वेलरी ब्रँडदेखील आहे. याशिवाय अभिनेत्री असण्याबरोबरच प्राजक्ता एक निर्मातीसुद्धा आहे. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच आगामी काळात तिचे तीन सिनेमे येणार आहेत. याबद्दल तिने प्रश्नोत्तरांच्या सेगमेंटमध्ये स्वत:च माहिती दिली आहे. त्यामुळे तिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत.
