Gashmeer Mahajani on Akshita Mudgal: गश्मीर महाजनी हा अनेक दिवसांनंतर टीव्हीवर परतला आहे. झी टीव्हीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत आदित्य साहू या भूमिकेत तो दिसला. इमली या मालिकेनंतर तो ‘लक्ष्मी निवास’मधील त्याची भूमिका प्रेक्षकांना आवडल्याचे पाहायला मिळाले.
गश्मीर महाजनी हा कायमच तो त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमीच अनेक गोष्टी शेअर करतो. तसेच, आस्क गश या सेशनमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या सेशनमध्ये तो त्याच्या चाहत्यांशी संवाद साधतो. चाहते त्याला अनेक प्रश्न विचारत असतात. गश्मीरदेखील त्या प्रश्नांची उत्तरे देतो. अनेकदा चाहते त्याला त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच, त्याच्या मुलाबद्दलही प्रश्न विचारताना दिसतात.
नुकताच गश्मीरने आस्क गश हे सेशन घेतले होते. त्यावेळी त्याला नवीन मालिकेतील त्याच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. एका चाहत्याने त्याला विचारले की, ‘लक्ष्मी निवास’मध्ये कॅमिओ करण्याचे काय कारण होते? त्यावर अभिनेता म्हणाला, “एक चांगली व्यक्तिरेखा साकारण्यात मजा आली.”
आणखी एका चाहत्याने विचारले की, लक्ष्मी निवास मालिकेत अक्षिता मुद्गलबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे? त्यावर अभिनेता म्हणाला, “ती खूप खूप गोड मुलगी आहे. प्रोफेशनल आणि खूप मदत करणारी आहे. मी तिला शुभेच्छा देतो.”
आणखी एकाने विचारले की, मराठी कलाकारांना स्टार व्हॅल्यू का नाही? आम्ही मराठी कलाकारांचा आदर करतो; पण आम्हाला सुपरस्टार हवेत. त्यावर गश्मीर म्हणाला की, थोडा संयम ठेवा.
मालिकेत तुम्हाला एका लहान मुलीबरोबर पाहून तुमचा मुलगा व्योमला ईर्षा वाटते काय? त्यावर अभिनेता म्हणाला की, तो टीव्ही पाहत नाही. तर काहींनी प्राजक्ता माळीबरोबर पुन्हा कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, असे विचारले. त्यावर गश्मीरने काही माहीत नाही, कल्पना नाही, असे उत्तर दिले.
एकाने विचारले की, तुझी यशाची व्याख्या काय आहे? त्यावर अभिनेता म्हणाला, “मला जे करायचे आहे ते मिळवणे, तिथपर्यंत पोहोचणे म्हणजे माझ्यासाठी यश आहे.
आणखी एका चाहत्याने विचारले की, तू तुझे व्यावसायिक आणि खासगी आयुष्य यामध्ये एकाच वेळेस कसा समतोल ठेवतोस? त्यावर गश्मीर म्हणाला की, माझी पत्नी या गोष्टी करते.
अशा अनेक प्रश्नांची गश्मीरने उत्तरे दिली. आता गश्मीर कोणत्या प्रोजेक्टमधून आगामी काळात भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
