Gaurav More Meets 1st Indian Idol Abhijeet Sawant : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून सर्वत्र लोकप्रिय झालेलं एक नाव म्हणजेच गौरव मोरे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरवने प्रत्येकाची मनं जिंकून घेतली आहेत. गौरव सध्या विविध सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. काही दिवसांपूर्वीच गौरवच्या नव्या घरी जॉनी लिव्हर यांनी भेट दिली होती. आता गणेशोत्सवानिमित्त अभिनेता स्वत: एका लोकप्रिय कलाकाराच्या घरी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. याचं नाव आहे अभिजीत सावंत.

गौरव मोरे पहिल्यांदाच लोकप्रिय गायक अभिजीत सावंतची भेट घेण्यासाठी पोहोचला होता. मराठमोळा गायक अभिजीत सावंत भारताचा पहिला इंडियन आयडॉल ठरला होता. हा शो जिंकल्यावर त्याने ‘आपका अभिजीत सावंत’ हा म्युझिक अल्बम लॉन्च केला होता. या अल्बमला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अभिजीतचं ‘मोहब्बतें लुटाऊंगा’ हे गाणं सर्वत्र तुफान गाजलं होतं. अगदी आजही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. आयुष्यात एकदा तरी अभिजीत सावंतला भेटायचं असं कित्येकांचं स्वप्न असतं. गौरव मोरेचं हेच स्वप्न आता पूर्ण झालं आहे.

या भेटीदरम्यानचा व्हिडीओ शेअर करत गौरव मोरे लिहितो, “हॅलो मित्रांनो, आज मी कोणाला भेटणारे माहिती आहे का? मला किती आनंद होतोय…हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण, माझ्यासाठी ही फॅन मुमेंट आहे. खरंतर, त्या व्यक्तीला भेटणं हे 90s मधल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं. या क्षणाची मी तब्बल २१ वर्षे वाट पाहिली. तर आपण भेटणार आहोत..पहिला Indian Idol असलेल्या अभिजीत सावंत दादांना. पहिल्यांदाच भेट झाली…खूप खूप प्रेम दादा आणि ही भेट अंकित प्रभू तुमच्यामुळे शक्य झाली. अभिजीत सर लव्ह यू!” या व्हिडीओला अवघ्या तासाभरात असंख्य चांगले व्ह्यूज मिळाले असून, नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

गौरवने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अभिजीत सावंतने, “तुला भेटून मलाही खूप आनंद झाला” अशी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय अन्य नेटकरी म्हणतात, “अप्रतिम गौरव…इतका सुंदर क्षण तू आमच्याबरोबर शेअर केलास”, “खूप भारी..”, “तुम्ही दोघंही खूप छान आहात”, “अभिजीत दादा कमालच आहेत” अशा कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.