Gaurav More New Home : विनोदाचं अचूक टायमिंग साधत अभिनेता गौरव मोरे गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्याने काही महिन्यांपूर्वीच आपल्या तमाम चाहत्यांना नवीन घर खरेदी केल्याची आनंदाची बातमी दिली. आता गौरवने आपल्या कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. अभिनेता नुकताच लग्नबंधनात देखील अडकला आहे. गौरवने प्रियांका कारेकरसह लग्नगाठ बांधली असून त्याच्या मित्रमंडळींनी हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये गौरवच्या नव्या घराचा फर्स्ट लूक सर्वांना पाहायला मिळतोय.
गौरव आजच्या घडीला स्टार असला तरीही एक काळ असा होता जेव्हा त्याने अतिशय कष्ट करून दिवस काढले आहेत. तेव्हा केलेल्या मेहनतीची जाणीव त्याला आजही आहे. ताडपत्रीच्या घरात गौरवचं बालपण गेलं होतं. पण, हे कठीण दिवस नक्कीच बदलतील आणि आपलं या मायानगरीत हक्काचं घर असेल, असा विश्वास त्याच्या मनात होता आणि फिल्टरपाड्याच्या बच्चनचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. म्हाडा लॉटरीत गौरवला पवई येथील घर लागलं होतं. यानंतर घराचा ताबा मिळाल्यावर अभिनेत्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली होती. आता गौरवने या घराला आलिशान लूक दिला आहे. म्हणजेच अभिनेत्याच्या घरी इंटिरियरचं काम पूर्ण झालं असून, आता त्याने नव्या घरात आपल्या पत्नीसह गृहप्रवेश केला आहे.
गौरवने त्याच्या नव्या घराच्या दारावर खास नेमप्लेट लावली आहे. यावर अभिनेत्याने स्वत:चं ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ हे टोपणनाव लिहिलं आहे. गौरवला सर्वत्र ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून ओळखलं जातं. कितीही मोठं घर घेतलं तरी फिल्टरपाड्याशी जोडली गेलेली नाळ कधीच तुटणार नाही अशा भावना गौरवने व्यक्त केल्या आहेत.
गौरवच्या नव्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ फुलांची सजावट केल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय पेस्टल रंगाच्या थीमनुसार त्याच्या घराचं प्रवेशद्वार डिझाइन करण्यात आलं आहे.

“ताडपत्री ते फ्लॅट असा हा प्रवास आहे. घरच्यांना त्या नव्या घराचा आनंद घेताना बघून मन भरून आलं आणि वाटलं आपण आपल्या परिवारासाठी काहीतरी केलं. माझी नाळ कायम फिल्टर पाडा आणि पवईसह जोडली गेली आहे आणि ती कधीच तुटणार नाही. माझं हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी म्हाडाचे मनापासून आभार मानतो.” अशा भावना गौरवने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टमध्ये व्यक्त केल्या होत्या.
