Gaurav More Reel Video : विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय विनोदी अभिनेता म्हणून गौरव मोरेला ओळखलं जातं. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पण, गौरवचा इंडस्ट्रीतला प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीच्या दिवसांत प्रचंड संघर्ष, मेहनत करून त्याने आज एवढं यश मिळवलं आहे. गौरवला त्याचे चाहते ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून देखील ओळखतात. काही महिन्यांपूर्वीच गौरवने पवईत आलिशान घर खरेदी केलं. या नव्या घराची संपूर्ण झलक गौरवने काहीशी हटके पद्धतीने आपल्या चाहत्यांना दाखवली आहे.
गौरव मोरेने नुकताच एक Reel व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये गौरव बॉलीवूड अभिनेता गोविंदाची नक्कल करताना दिसतोय. २००२ मध्ये गोविंदाची प्रमुख भूमिका असलेला ‘वाह! तेरा क्या कहना’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये गोविंदा आणि कादर खान यांचा एक भन्नाट कॉमेडी सीन आहे. या सीनमध्ये गोविंदा सगळं विकून टाका “बेच मारो इसको!” असं म्हणताना दिसतो. हाच सीन गौरवने त्याच्या रीलमध्ये रिक्रिएट केला आहे.
गोविंदा यामध्ये म्हणतो, “मॅनेजर.. ही केबिन कुणाची आहे… बेच मारो इसको! आणि याचे पैसे माझ्या नव्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करा” या मूळ सीनमध्ये गोविंदा त्याच्या मोठ्या भावाची, दोन्ही काकांची अगदी ऑफिसच्या वॉशरूमची जागाही विकून टाका असं मॅनेजरला सांगत असतो.
गौरव मोरेने त्याच्या नव्या घरात फेरफटका मारत हा व्हिडीओ शूट केला आहे. त्यामुळे एका युजरने अभिनेत्याच्या व्हिडीओवर “घर दाखवण्याची निंजा टेक्निक” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने, “तुला हास्यजत्रेत मिस करतोय…परत ये” असं गौरवच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हटलं आहे.
“सगळं बेच मारलं तर तुम्ही कुठे राहणार?”, “दादूस…. सबको बेच मारणा है क्या”, “सध्या तरी तुझं घर पाहून छान वाटतंय”, “बेस्ट अभिनेता आमचा गौरव मोरे”, “बेचमारो सबकुछ”, “स्टार गौरव मोरे” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, गौरव मोरेने काही दिवसांपूर्वीच आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला. म्हाडा लॉटरीत गौरवला पवई येथील घर लागलं होतं. आता अभिनेत्याने या २ BHK घराला आलिशान लूक दिला आहे. गौरवने प्रवेशद्वाराच्या बाहेर ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ अशी नेमप्लेट लावली आहे. कितीही मोठं घर घेतलं तरी फिल्टरपाड्याशी जोडली गेलेली नाळ कधीच तुटणार नाही अशा भावना गौरवने व्यक्त केल्या, त्यामुळेच घराबाहेर ही खास नेमप्लेट त्याने लावली आहे.
