Saraswatichandra Fame Gautam Rode and Jennifer Winget: स्टार प्लसवरील गाजलेली मालिका ‘सरस्वतीचंद्र’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेतील सरस्वतीचंद्र आणि कुमुद यांची केमिस्ट्री पाहून अनेक चाहत्यांना वाटलं होतं की गौतम रोडे आणि जेनिफर विंगेट खऱ्या आयुष्यातही रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र, गौतमने या अफवांना पूर्णविराम दिला आहे. गौतम म्हणाला, “आम्ही सुरुवातीची दीड वर्ष एकमेकांशी साधे बोललोही नव्हतो, आमच्याकडे एकमेकांचे नंबरही नव्हते.” संजय लीला भन्साळी निर्मित या मालिकेत काम करताना जेनिफर आणि गौतममध्ये सुरुवातीला दुरावा होता, पण तरीही पडद्यावर त्यांची केमिस्ट्री कशी काय सुपरहिट ठरली, याबद्दल गौतमने दिलेले उत्तर सध्या चर्चेत आहे.

‘पिंकविला’शी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत गौतमने जेनिफरबरोबर काम करण्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्याने सांगितलं की, सुरुवातीला ते एकमेकांशी अजिबात बोलत नसत, पण हळूहळू त्यांच्यात एक चांगलं नातं निर्माण झालं. मात्र, त्यांच्यात प्रेमासारखे काहीही नव्हतं, असं त्याने स्पष्ट केलं.

जेनिफरबद्दल गौतम काय म्हणाला?

जेनिफरसोबतच्या मैत्रीबद्दल विचारल्यावर गौतम म्हणाला, “आम्ही दीड वर्ष एकमेकांशी बोललो नव्हतो. आम्ही फक्त एकमेकांना ‘हाय हॅलो’ करायचो, अगदी एकमेकांचे नंबरही आमच्याकडे नव्हते. तरीही आमच्या दोघांमधील केमिस्ट्री इतकी चांगली कशी, याचं सर्वांनाच आश्चर्य वाटायचं. ती तिच्या विश्वात मग्न असायची आणि मी माझ्या. आमचं बोलणं फारच कमी व्हायचं. त्यावेळी तिचं नुकतंच लग्न झाले होते. आम्ही सीनसाठी डायलॉग वाचायचो, टेक द्यायचो आणि आपल्या जागी परत जाऊन बसायचो.”

इच्छा नसेल तरी काम करू शकतो – गौतम रोडे

गौतमने पुढे स्पष्ट केलं की, “कधीकधी लोक म्हणतात की परिस्थिती थोडी विचित्र असू शकते, पण तोच तर मुख्य मुद्दा आहे. आम्ही कलाकार आहोत; समोरच्या व्यक्तीशी मी बोलत नसेन किंवा त्याचं तोंड पाहायची इच्छा नसली, तरीही मी त्यांच्याबरोबर उत्तम काम करू शकतो. यासाठी त्या व्यक्तीचीही काम करण्याची तयारी असायला हवी. मला त्यात कोणतीही अडचण येत नाही. हे माझे प्रोफेशन आहे, त्यामुळे या क्षेत्रात काम करताना आपण एकमेकांचे जिवलग मित्र असायलाच हवं असं अजिबात नाही.”

दीड वर्षांनंतर मित्र झाले गौतम-जेनिफर

गौतम पुढे म्हणाला, “हो, पण दीड वर्षानंतर आम्ही चांगले मित्र झालो. त्यानंतर आम्ही हसत एकमेकांना म्हणायचो की आपण आधी का नाही बोललो! आम्ही फारशा मुलाखती दिल्या नाहीत, पण जेव्हा आमची मैत्री झाली तेव्हा सर्वांना वाटलं की आमच्यात नक्कीच काहीतरी सुरू आहे. मात्र, आमच्यात तसं काहीही नव्हतं.”

‘सरस्वतीचंद्र’ ही मालिका याच नावाच्या प्रसिद्ध गुजराती कादंबरीवर आधारित होती. संजय लीला भन्साळी यांनी या मालिकेची निर्मिती केली होती आणि प्रदर्शनाच्या वेळी या मालिकेला प्रेक्षक व समीक्षकांकडून प्रचंड पसंती मिळाली होती.

गौतम रोडे याने ५ फेब्रुवारी २०१८ रोजी त्याची सह-कलाकार पंखुडी अवस्थी हिच्याशी लग्न केलं. २०२३ मध्ये हे दोघे जुळ्या मुलांचे आई-बाबा झाले. दुसरीकडे, जेनिफरने २०१२ मध्ये करण सिंग ग्रोव्हरशी लग्न केलं होतं. मात्र, त्यांच्या नात्यात दुरावा आल्यानं २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. करणने नंतर बिपाशा बासूशी लग्न केलं आहे. या जोडप्याला एक मुलगी आहे.