Jahnavi Killekar & Gautami Patil Dance Video : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर घराघरांत लोकप्रिय झाली. तिने आजवर छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. मात्र, ‘बिग बॉस’मुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आता शो संपल्यावरही तिची लोकप्रियता कायम आहे. यामुळेच अनेक कार्यक्रमांना जान्हवीला विशेष पाहुणी म्हणून निमंत्रित केलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अशाच एका कार्यक्रमादरम्यान जान्हवीची भेट प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलशी झाली.
जान्हवी किल्लेकर अभिनयाच्या जोडीला उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे. त्यामुळे गौतमी अन् जान्हवी यांची भेट झाल्यावर या दोघींनी दादा कोंडकेंच्या सुपरहिट गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. या दोघींचा डान्स व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
दादा कोंडके यांचं “हिल हिल पोरी हिला…” हे सदाबहार गाणं आता नव्या व्हर्जनमध्ये रिक्रिएट करण्यात आलं आहे. ५२ वर्षांपूर्वीच्या या सुपरहिट गाण्याचं एक नवीन व्हर्जन नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यामध्ये स्वत: गौतमी पाटील आणि लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकली आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर सर्वत्र ट्रेंड होत आहे. आता गौतमी भेटल्यावर जान्हवीने याच गाण्यावर तिच्यासह डान्स केला आहे.
गौतमीने या व्हिडीओला, “डार्लिंग…हिल पोरी हिला” असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये गौतमीने पोपटी रंगाची अन् जान्हवीने काळ्या रंगाची सुंदर साडी नेसल्याचं पाहायला मिळत आहे. नेहमीप्रमाणे गौतमी-जान्हवीच्या कमाल एक्स्प्रेशन्सनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओला अवघ्या ३ तासांत साडेचार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दरम्यान, नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “सौंदर्याचा डबल डोस…दोघीही सुंदर”, “सो स्वीट”, “गौतमीचा नाद करायचा नाही”, “गौतमी आणि जान्हवी मॅडम दोघीही खूप छान नाचल्या”, “मस्त डान्स केलात” अशा असंख्य प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
