Gayatri Datar’s Emotional Wedding Video: गेल्या काही काळापासून मराठी मनोरंजन विश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांनी लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. यामध्ये नंदिता पाटकर, सोहम बांदेकर व पूजा बिरारी, मयुरी कापडणे, ईशा डे, रूमानी खरे व स्तवन शिंदे या आणि अशा अनेक कलाकारांचा या यादीत समावेश आहे. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. ही अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार होय.
गायत्री दातारने २७ एप्रिल २०२६ ला लग्नगाठ बांधली. तिच्या नवऱ्याचे नाव श्रीकांत चवरे असे आहे. विशेष म्हणजे तो मनोरंजनसृष्टीत काम करत नाही. त्याने आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच, तो ड्रोन फोटोग्राफर असल्याचेदेखील त्याने इन्स्टाग्रामवरील बायोमध्ये लिहिले आहे.
याआधी गायत्रीच्या लग्नातील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अगदी तिच्या साड्यांपासून ते तिच्या मंगळसूत्रांपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा झाली. मेहंदी, हळद, सप्तपदी अशा विविध सोहळ्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले. लग्नाच्या विविध कार्यक्रमातील गायत्रीच्या लूकने लक्ष वेधून घेतले होते. तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाले.
आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गायत्रीची आई तिच्याबद्दल बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे.
“गायत्रीच्या दादाच्या जन्मानंतर ९ वर्षांनी आमच्या घरी आली एक गोड परी…”
गायत्रीच्या आई म्हणाल्या, “गायत्रीच्या दादाच्या जन्मानंतर ९ वर्षांनी आमच्या घरी आली एक गोड परी, सगळ्यांच्या आवडीने आम्ही तिचं नाव ठेवलं गायत्री, इतकी गोड छोटी मुलगी कधी एवढी मोठी झाली कळलंच नाही, एवढी मोठी करता करता हाताचा पाळणा केला तुझ्यासाठी असं कधी म्हणणार नाही, कारण स्पर्शच तुझा इतका मखमली, या हातांना भार कधी झाला नाही. खूप रात्री जागवल्यात तुझ्यासाठी असंही म्हणणार नाही. गोड, निरागस तुला पाहताना रात्री कधी संपली हे कळलं नाही.
त्या पुढे म्हणाल्या, “हळूहळू मोठी होत गेली गायत्री, शाळेत जायची, मला छान वाटायचं. तुझा खूप अभ्यास घेतला असं कधी म्हणणार नाही. समज छान होती तुझी, अभ्यास घेण्याचा त्रास झाला नाही. खूप वळण लावलं तुला असं कधी म्हणणार नाही, सरळ-साधा स्वभाव तुझा, वळवावा लागला नाही. स्वयंपाक शिकवला तुला असं कधी म्हणणार नाही. हाताला चव आहे तुझ्या, लक्षात ठेव फक्त समाधानाचा मार्ग पोटातून जाई. खूप काळजी वाटते तुझी असंही कधी म्हणणार नाही. श्रीकांतसह सर्वांचं प्रेम पाहून ती काळजी मनाला शिवत नाही.” पुढे त्यांनी गायत्री व श्रीकांतला आशीर्वाद दिला.
हा व्हिडीओ शेअर करत श्रीकांतने लव्ह यू आई अशी कॅप्शन दिली आहे. तसेच, भावूक झालेल्या इमोजी शेअर केल्या आहेत. तिच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी खूप सुंदर असे म्हणत कौतुक केले आहे.
