Gayatri Datar : लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातारला एका कॅब ड्रायव्हरमुळे भयंकर मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. या संपूर्ण घटनेबाबत अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. याशिवाय तिने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मदतीची मागणी देखील केली होती. गायत्री ९ एप्रिलला सकाळी पुण्याला निघाली होती, यासाठी तिने कॅब बूक केली. पण, त्यानंतर निघायला उशीर होणार असल्याने तिने आधीच कॅब कॅन्सल केली. गायत्रीने कॅब कॅन्सल केल्यावर या गाडीच्या ड्रायव्हरने तिला सतत फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर त्यानंतर अभिनेत्रीला वेगवेगळ्या फोन नंबरवरून फोन येऊ लागले.

गायत्रीने या सगळा भयानक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर अनेकांनी तिला पोलिसांची मदत घेण्याचा सल्ला देखील दिला होता. आता या संपूर्ण घटनेत पुढे काय घडलं? याची अपडेट अभिनेत्रीने आणखी एक पोस्ट शेअर करत सर्वांना सांगितली आहे.

गायत्री म्हणाली, “नमस्कार! काल घडलेल्या घटनेची अपडेट मी आता तुमच्याबरोबर शेअर करतेय. तर, तो कॅब ड्रायव्हर मला सकाळपासून- दुपारपर्यंत सतत वेगवेगळ्या नंबरवरून सतत फोन करत राहिला. त्याने माझा पर्सनल नंबर एका ग्रुपवरही शेअर केला होता. यामुळे मला सतत फोनकॉल्स येत होते. मला या सगळ्यामुळे भयंकर मानसिक त्रास झाला आणि हा सगळा अनुभव फारच भयानक होता. सुदैवाने माझा एक मित्र पोलीस अधिकारी आहे त्याने मला यात मदत केली. त्या माणसाने मला फोन करणं आता थांबवलं आहे.”

“जी काही घटना माझ्याबरोबर घडली…मी आणि माझे कुटुंबीय अजूनही यातून बाहेर आलेलो नाही आहोत. तुम्ही सर्वांनी खूप पाठिंबा दिलात…यासाठी तुमचे आभार. मी आता त्या व्यक्तीविरोधात FIR दाखल करणार नाहीये. कारण, मला यावर माझा वेळ वाया घालवायचा नाहीये.” असं गायत्रीने स्पष्ट केलं आहे.

या सगळ्या प्रकारामुळे गायत्री प्रचंड अस्वस्थ झाली होती. मी खूप घाबरलेय आणि रडतेय…मला माझ्या सोसायटीच्या बाहेर जायची सुद्धा भीती वाटतेय असं गायत्रीने गुरुवारी ( ९ एप्रिल ) शेअर केलेल्या स्टोरीमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे अभिनेत्रीचे चाहते सुद्धा काळजीत पडले होते. या सगळ्यांना आता गायत्रीने शेअर केलेली लेटेस्ट अपडेट पाहून दिलासा मिळाला आहे.

gayatri datar cab driver
गायत्री दातारची पोस्ट

दरम्यान, गायत्री दातारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, झी मराठीच्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेमुळे तिला घराघरांत लोकप्रियता मिळाली. यानंतर ती ‘अबीर गुलाल’ मालिकेत झळकली आता वैयक्तिक आयुष्यात लवकरच ती विवाहबंधनात अडकणार आहे.