Gayatri Datar on relationship with in-laws: गायत्री दातारने एप्रिल २०२६ मध्ये लग्नगाठ बांधली. श्रीकांत चवरे असे तिच्या पतीचे नाव आहे. आता या जोडीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

“आमचं नातं सासू-सुनेचं…”

गायत्री व श्रीकांत यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत गायत्रीने तिचे सासू सासरे आणि नणंद यांच्याबरोबर कसे नाते आहे, याबद्दल वक्तव्य केले. गायत्री म्हणाली, “आमचं नातं सासू-सुनेचं आहे असं मला कधी वाटलं नाही. कारण- त्या जेव्हा केव्हा इकडे येतात, तेव्हा त्यांना असं होतं की तू स्वयंपाक नको करूस, तुला त्रास होईल. आपण मागवू काहीतरी, तू कशाला इतके कष्ट घेत आहेस? किंवा तू कशाला काम करतेस, असे त्या मला म्हणत असतात. आपण जे ऐकलेलं असतं की सासू सुनांबरोबर अमुक अशा पद्धतीने वागतात, तसं मला काही वाटलं नाही. पण, आपण आपली एखादी मावशी, काकू किंवा आत्या असतात, ज्यांना आपण लहानपणापासून ओळखत असतो, तशाच मला काकू वाटतात.”

सासऱ्यांबद्दल गायत्री म्हणाली, “श्रीकांतचे वडीलसुद्धा खूप कमाल आहेत. त्यांची विनोदबुद्धी आणि त्यांचा एकूण स्वभाव मला प्रचंड आवडतो.” नणंदेबद्दल ती म्हणाली, “त्याची लहान बहीणसुद्धा आहे. ती आता सीए करत आहे. तिचं आणि माझं खूपच मस्त जमतं. आमचं एवढं चांगलं जमतं की याची बोलतीच बंद होते.”

गायत्री म्हणाली, “मला सासरचे कुटुंब छान मिळाले आहे. हे तिघं तर आहेतच, पण श्रीकांतचे कुटुंब मोठे आहे. म्हणजे मावशा, मामा, इतर भावंडं असं मोठं कुटुंब आहे. तर हे कमाल, आनंदी, कुटुंब आहे. ते सतत एकमेकांना भेटत असतात. ट्रिपला जात असतात, पावसाळी पिकनिक असते. खूप उत्साही कुटुंब आहे, त्यामुळे मला त्यांच्याबरोबर खूप मजा येते. कारण-माझी सगळी चुलत, मावस भावंडं ही परदेशात राहतात आणि आमच्या कुटुंबात मी सगळ्यात लहान आहे. माझा सगळ्यात मोठा दादा माझ्यापेक्षा २० वर्षांनी मोठा असेल, त्यामुळे खूप नातेवाईक, खूप मजा असं वातावरण मला कमी प्रमाणात मिळालं आहे. पण, श्रीकांतच्या घरात खूप माणसं आहेत, खूप मजा असते. घरात कोणा एकाचा वाढदिवस असला तर ६० लोक असतात. खूप धमाल असते”, असे म्हणत सासरी मजा असते, उत्साहाचं वातावरण असतं असं गायत्रीने सासरबद्दल सांगितले.