मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पूजा बिरारी, प्राजक्ता गायकवाड, अनुष्का पिंपुटकर अशा अनेक अभिनेत्री यंदाच्या वर्षी लग्नबंधनात अडकल्या. तर, ज्ञानदा रामतीर्थकरचा नुकताच साखरपुडा पार पडल्याचं पाहायला मिळालं. आता या पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने चाहत्यांबरोबर लग्न ठरल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. तसेच सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याची ओळखही सर्वांना करून दिली आहे.
‘तुला पाहते रे’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री गायत्री दातार आता लवकरच बोहल्यावर चढणार आहे. काही दिवसांपूर्वीच “माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झालेली आहे” असं कॅप्शन देत गायत्रीने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली होती.
मात्र, अभिनेत्रीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा रिव्हिल केला नव्हता. गायत्रीच्या खऱ्या आयुष्याचा ‘हिरो’ नेमका कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आतुर झाले होते. अखेर ख्रिसमसच्या दिवशी तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख सर्व चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून करून दिली आहे.
गायत्री पोस्ट शेअर करत म्हणते, “भेटा माझ्या आयुष्यातील सांताला…” या कॅप्शनपुढे अभिनेत्रीने ‘Engage’ असा हॅशटॅग देखील वापरला आहे. अभिनेत्रीच्या जोडीदाराचं नाव आहे श्रीकांत चवरे ( Shrikant Chavare ). तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट आहे, त्याने बायोमध्ये नमूद केल्यानुसार IIT Bombay मधून त्याचं शिक्षण पूर्ण झालं आहे. तो ड्रोन फोटोग्राफर आहे. त्याला ट्रॅव्हल व फोटोग्राफीची आवड आहे.
गायत्रीने सोशल मीडियावर होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा रिव्हिल केल्यावर नेटकऱ्यांनी तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आता गायत्री लग्नबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, गायत्री दातारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ‘तुला पाहते रे’ ही तिची मालिका प्रचंड गाजली. यानंतर ती ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात झळकली होती. गायत्रीने ‘कलर्स मराठी’च्या ‘अबीर गुलाल’ या मालिकेत सुद्धा शुभ्रा ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. याशिवाय ‘झी मराठी’च्या ‘चल भावा सिटीत’ या कार्यक्रमात ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
