‘तुला पाहते रे’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार आता लवकरच बोहल्यावर चढणार आहे. काही दिवसांपूर्वीच “माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झालेली आहे” असं कॅप्शन देत गायत्रीने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे श्रीकांत चवरे. या दोघांची जोडी नेमकी कशी जुळली याबद्दल त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
दोघांच्या पहिल्या भेटीबद्दल श्रीकांत चवरे ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “आम्ही एकमेकांना गेल्या दीड वर्षांपासून डेट करतोय. आम्ही एका डेटिंग अॅपवर भेटलो. मी जास्त मराठी शो बघत नाही. जेव्हा गायत्रीच्या मालिका सुरू होत्या, तेव्हा मी जपानमध्ये कामाला होतो. त्यामुळे मला हिच्या कामाबद्दल फारशी कल्पना नव्हती. मी हिचं प्रोपाइल पाहिलं, अभिनेत्री आहे असं दिसलं…त्यानंतर मग आमचं बोलणं सुरू झालं. पण, तिने मला स्वत:चं पूर्ण नाव सांगितलं नव्हतं. ‘मी गायत्री आहे’ इतकंच तिने सांगितलं होतं. मी तिला एकदा सहज विचारलं की, तू काय करतेस? त्यावेळी तिने मला घरात टीव्ही पाहतानाचा एक फोटो पाठवला. त्यात खाली एक पाटी ठेवली होती…गायत्री दातार. माझं असं झालं…लोक घराच्या दारावर पाटी लावतात, हिच्या नावाची पाटी घरात का आहे? ती ‘बिग बॉस’च्या घरातली नेमप्लेट होती. मी तेव्हा हिच्याबद्दल थोडं सर्च केलं…मग मला समजलं ही अभिनेत्री आहे…हिने असं-असं काम केलंय. त्यानंतर मग आम्ही भेटलो, आमच्यात छान बोलणं झालं. तिथून ही सगळी सुरुवात झाली होती.”
रात्री १० वाजता भेटलो, तीन तास गप्पा मारल्या…
पुढे गायत्री सांगते, “मी माझ्या मित्र-मैत्रिणींमुळे डेटिंग अॅप डाऊनलोड केलं होतं. सगळं प्रोफाइल भरलं…त्यानंतर बऱ्याच लोकांनी मला ओळखलं. पण, मला कोणत्याही फॅनबॉयला भेटण्याची इच्छा नव्हती. कोणीतरी माझा फॅन आहे म्हणून आपण डेटवर चाललोय हे मला नको होतं. मी एक-दोन डेट्सवर सुद्धा गेले होते…पण आमच्या Vibes मॅच झाल्या नाहीत. त्यानंतर मग मी श्रीकांतचं प्रोफाइल पाहिलं. आमचं बोलणं सुरू झाल्यावर मी त्याला माझं नावही सांगितलं नव्हतं, माझा नंबर सुद्धा दिला नव्हता. आम्ही डेटिंग अॅपवरच चॅट करायचो. एक दिवस आमचं भेटायचं ठरलं…ते मी लवकर मेसेज पाहिले नाहीत म्हणून कॅन्सल झालं. नंतर हा बाहेरगावी गेला…पुढे आम्ही एक महिन्यांनी भेटलो. तेव्हा आम्ही रात्री १० वाजता पहिल्यांदाच भेटलो. कारण, माझ्या मालिकेचं शूट सुरू होतं. तेव्हा आमच्या तीन तास गप्पा रंगल्या होत्या.”
लग्नाचं केव्हा ठरलं?
श्रीकांत याबद्दल म्हणाला, “मला पहिल्या एक-दोन महिन्यांतच समजलं होतं की आमचं छान जमेल. पण, तिने कधी भावना एक्स्प्रेस केल्या नव्हत्या. त्यानंतर मग आम्ही एकदा लोणावळ्याला गेलो होतो…त्यावेळी तिने मनातल्या सगळ्या भावना बोलून दाखवल्या होत्या.”
गायत्री यावर म्हणाली, “मला एक दिवस असं मनापासून वाटलं की, आता करुयात लग्न…लोणावळ्यात मी त्याला अचानक बोलले की, आता आपण घरी वगैरे सांगूयात.”
गायत्रीचे बाबा श्रीकांतशी ४५ मिनिटं बोलले…
घरी लग्नाचं केव्हा सांगितलं याबद्दल सांगताना श्रीकांत म्हणाला, “माझ्या बाबांनी घरी लग्नाचा विषय काढला होता…तेव्हा मी गायत्रीबद्दल सगळं सांगून टाकलं. आई तेव्हा म्हणाली होती, अच्छा म्हणून तू ‘चल भावा सिटीत’ कार्यक्रम बघत होतास का? माझे आई-बाबा तिला भेटले. त्यांना आता माझ्यापेक्षा जास्त गायत्री आवडू लागलीये.”
तर गायत्री घरच्यांबद्दल सांगते, “माझ्या घरी…माझं लग्न हा विषयच नव्हता. तुझ्या आयुष्यात तू आनंदी राहिली पाहिजेस असं माझ्या आई-बाबांचं म्हणणं होतं. मग माझ्या बाबांनी बंबल वगैरे काय असे प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. मग मी त्यांना समजावून सांगितलं होतं. मग मी याच्याबद्दल सगळी माहिती दिली. बाबांनी त्याला सकाळीच फोन केला. तो नुकताच झोपेतून उठला होता. त्यानंतर जवळपास ४५ मिनिटं हे दोघंही फोनवर बोलत होते. बाबांनी त्याला काळजीपोटी माझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट सांगितली, माझ्या कामाची माहिती दिली. त्यानंतर मग बाबांची आणि याची पहिली भेट झाली. दोघांच्याही घरी विरोध, ड्रामा असं कुठेच काही झालं नाही. दोन्ही कुटुंब भेटली आणि सगळं एकदम छान झालं.”

