गायत्री दातार अलीकडेच श्रीकांत चावरेसह लग्नबंधनात अडकली. अभिनेत्रीने थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. मात्र कोणाला माहीत नसेल की गायत्री व श्रीकांत यांचं लग्न जवळपाद रद्द होणार होतं. तिच्या आई-वडिलांनी पत्रिका वाटणंही बंद केलं होतं. अभिनेत्रीने आता यामागचं कारण सांगत खुलासा केला आहे.

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत या जोडीला त्यांच्या लग्नात कुठला लोचा म्हणजेच घोळ झाला होता का असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्यांच्या लग्नाआधीचा हा किस्सा सांगितला. लग्न कुठल्याही अडचणीशिवाय होणं हे त्यावेळी त्यांना जवळपास अशक्य वाटत होतं असं त्यांनी सांगितलं. गायत्री म्हणाली, “छोटे मोठे घोळ तर होतच असतात. पण लग्न कॅन्सल होणार होतं. काय झालं की आम्ही एप्रिलमध्ये लग्न करणार होतो आम्ही केलंही पण त्यावेळी एलपीजीसंदर्भात समस्या सुरू होत्या.”

गायत्रीने सांगितला लग्नापूर्वीचा किस्सा

गायत्रीने याबद्दल पुढे सांगितलं की “इतक्या समस्या निर्माण झाल्या होत्या की हॉटेल बंद होत होते. लग्नांना जेवण पोहचत नव्हतं आमच्याबाबतीतही असंच काहीसं झालं. आम्ही रिसॉर्ट बुक केलं, पत्रिका छापल्या त्या वाटायला सुरुवात केली. पण जो केटरर होता तो म्हणाला की मला नाही जमणार आमच्याकडे एलपीजी नाहीये आमचं असं झालं की आता काय करायचं. चुलीवर जेवण करायचं की ते रिसॉर्टमधील लग्न कॅन्सल करुन घरच्या घरीच विधी करुन डॉक्युमेंट साइन करुन लग्न करुया. एवढ्यापर्यंत विचार झाला होता माझ्या आई-वडिलांनीही पत्रिका देणं बंद केलं होतं कारण माहीतच नव्हतं की लग्न होणार आहे की नाही, लग्न पुढे ढकलायचं का वगैरे चर्चा सुरू होत्या. १५ दिवस हे सगळं सुरू होतं.”

गायत्रीने पुढे सांगितलं की यावेळी तिच्या एका मित्राने तिला खूप मदत केली लग्नातील जेवणाची सर्व जबाबदारी त्याने घेतली आणि शेवटी पुण्याजवळच्या भोर येथे त्यांचं लग्न झालं. तिने यावेळी असंही सांगितलं की जर तिच्या मित्राकडून तिला मदत मिळाली नसती तर त्यांनी व त्यांच्या कुटुबीयांनी घरच्या घरीच पुण्यात फक्त जवळच्या अगदी काही मोजक्याच लोकांच्या साक्षीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, गायत्री दातार व श्रीकांत चावरे यांनी २७ एप्रिल २०२६ रोजी भोर येथे थाटामाटात आणि पांरपरिक पद्धतीने लग्न केलं. दोघांच्या लग्नातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.