Gayatri Datar : अभिनेत्री गायत्री दातारने शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मदतीची मागणी केली आहे. गायत्री आज ( ९ एप्रिल ) सकाळी पुण्याला निघाली होती आणि यासाठी तिने एका ऑनलाइन अ‍ॅपवरून कॅब बूक केली होती. निघायला उशीर होणार असल्याने गायत्रीने आधीच ही कॅब कॅन्सल केली पण, त्यानंतर तिला जो काही भयानक अनुभव आला तो तिने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितला आहे.

गायत्रीला कॅन्सल केलेल्या कॅबचा ड्रायव्हर गेल्या २ तासांपासून सतत फोन करून त्रास देतोय. इतकंच नव्हे तर तो आता वेगवेगळ्या फोननंबरवरून कॉल करत असल्याचंही तिने म्हटलं आहे. गायत्री तिच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणालीये पाहुयात…

गायत्री लिहिते, “मी आज सकाळी मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी कॅब बूक केली होती. पण, त्यानंतर कॅब येण्याआधीच मी बुकिंग कॅन्सल केलं कारण, मला सगळं सामान पॅक करण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार होता.”

“ते लोक माझा पाठलाग सुद्धा करू शकतात…” – गायत्री दातारची पोस्ट

“आता कॅब कॅन्सल केल्यावर तो ड्रायव्हर गेल्या २ तासांपासून मला मानसिक त्रास देतोय. सतत वेगवेगळ्या फोन नंबरवरून मला कॉल्स येत आहेत. मला आता माझ्या सोसायटीच्या बाहेर जायची सुद्धा भीती वाटतेय. मी प्रचंड घाबरलेय आणि मी रडत आहे, आणि मला आता खाली जायची खूप भीती वाटतेय. कारण, त्या ड्रायव्हरने मला खूप फोन केले आणि मला खूप वाईट बोलला. तो ज्या वेगवेगळ्या फोन नंबरवरून मला फोन करतोय ते लोक माझा पाठलाग सुद्धा करू शकतात…आणि कोणत्याही प्रकारे मला इजा पोहोचवू शकतात.” यामुळेच गायत्रीने सोशल मीडियावर हा भयानक अनुभव सांगत मदतीची मागणी केली आहे. तसेच ज्या अ‍ॅपवरून कॅब बूक केली होती..त्याच्याकडून कोणतीही मदत अद्याप मिळाली नसल्याचंही तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

gayatri datar
गायत्री दातारची पोस्ट

दरम्यान, गायत्री दातारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, झी मराठीच्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेमुळे तिला घराघरांत लोकप्रियता मिळाली. यानंतर ती ‘अबीर गुलाल’ मालिकेत झळकली आता वैयक्तिक आयुष्यात लवकरच ती विवाहबंधनात अडकणार आहे.