Ghanshyam Darvade buys new house: छोटा पुढारी म्हणून घन:श्याम दरवडेने सोशल मीडियावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाला होता. तो अनेकदा त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. आता मात्र तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याने २१ व्या वर्षी स्वत:चे नवीन घर घेतले आहे.
छोटा पुढारी घन:श्यामने घेतलं २१ व्या वर्षी हक्काचं घर
घन:श्यामने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो घराच्या समोर बसून पेपरवर सह्या करत असल्याचे दिसत आहे. त्याने स्वत:चे घर घेतले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले, “आज २१व्या वर्षी स्वतःच्या हिमतीवर माझं पहिलं घर बुक केलं.”
पुढे त्याने लिहिले, “आई-बाबांकडून एक रुपयाही न घेता मिळवलेलं हे घर माझ्या मेहनतीचं यश आहे. पण, या यशामागची खरी कहाणी माझ्या कष्टांची नाही तर आई-बाबांनी माझ्यासाठी आयुष्यभर केलेल्या त्यागाची आहे. माझ्या प्रत्येक गरजेसाठी त्यांनी स्वतःच्या इच्छा मारल्या. माझं भविष्य घडवण्यासाठी स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवली. माझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यासाठी त्यांनी कित्येकदा स्वतःच्या डोळ्यातलं पाणी लपवलं. आज घराच्या चाव्या माझ्या हातात आहेत, पण या घराच्या प्रत्येक विटेत आई-बाबांच्या त्यागाचा एक तुकडा आहे. “
त्याने पालकांना उद्देशून लिहिले, “आई-बाबा, तुम्ही मला आयुष्यभर घर दिलंत. आज तुमच्या संस्कारांनी मी माझं स्वतःचं घर उभं केलं.
ही माझी कमाई नाही, ही तुमच्या त्यागाला दिलेली माझी पहिली छोटीशी परतफेड आहे.”
व्हिडीओमध्ये तो असेही म्हणाला, “मित्रांनो, आज काय बोलावं तेच समजेना. कारण- बोलायला गेलं की डोळ्यांत पाणी येत आहे. पण एक सांगेन, आज मी जो काही आहे, तो सर्वसामान्य जनतेमुळेच आहे. तुम्ही कमेंट्समध्ये माझ्यावरचं प्रेम व्यक्त करता. तुमच्या प्रेमामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. मी एक गोष्ट शिकली आहे, ती म्हणजे आयुष्यात हारायचं नाही तर लढायचं. बापाला आपला अभिमान वाटला पाहिजे की हा मुलगा माझा आहे. बापाचं छप्पर तर असतंच, पण, त्यांनी म्हटलं पाहिजे की हा माझ्या मुलाचा बंगला आहे. आपलं एक स्वप्न असतं की माझं हक्काचं घर असलं पाहिजे, तसंच मी एक फ्लॅट खरेदी केला आहे.”
शेवटी तो असेही म्हणाला, “लोक काय म्हणतात याचा विचार करू नका. जगायचं तर आपल्या आई-बापासाठी जगा, लढायचं तर आपल्या आई-बापासाठी लढा, चार लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या.”
दरम्यान, घन:श्याम सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच भेटीला येत असतो.
