Gharoghari Matichya Chuli Star Pravah Serial New Entry : गेल्या काही दिवसांत छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नवनवीन कलाकारांच्या एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळालं. रेश्मा शिंदेच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत सुद्धा लागोपाठ दोन नवीन कलाकार आले आहेत. हे कलाकार नेमक्या कोणत्या भूमिका साकारणार आणि ही मालिका कोणत्या अभिनेत्रीने सोडलीये याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका गेल्या दोन वर्षांपासून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि अभिनेता सुमीत पुसावळे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेत हृषिकेश रणदिवेच्या बहिणीची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री भक्ती देसाई साकारत होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच भक्तीने या मालिकेतून एक्झिट घेतली.

भक्तीच्या एक्झिटनंतर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रिप्लेसमेंटच्या भूमिकेसाठी अभिनेत्री धनश्री काडगावकरची एन्ट्री झाली. धनश्रीने यापूर्वी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती. तिच्या एन्ट्रीबद्दल धनश्री म्हणते, “खरंतर ही मालिका सुरू होऊन आता दीड-दोन वर्षे झाली आहेत. पण, माझी नवीन एन्ट्री आहे असं मला खरंच वाटत नाहीये. कारण, काहीजण ओळखीचे आहेत…पण, जे माझ्या ओळखीचे नाहीत त्यांनीही मला खूप छान सांभाळून घेतलं आहे.”

धनश्रीच्या पाठोपाठ आता नुकतीच ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्याचं नाव आहे सौरभ चौघुले. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेमुळे सौरभ घराघरांत लोकप्रिय झाला. यानंतर त्याने हिंदी मालिकेतही काम केलं. आता सौरभने विक्रांतच्या भूमिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. ही विक्रांतची भूमिका सुरुवातीला अभिनेता अक्षय वाघमारे साकारत होता.

dhanashree kadgaonkar and saorabh choughule enters in the show
सौरभ चौघुलेची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका आधी संध्याकाळी प्राइम टाइमला प्रसारित केली जायची. मात्र, यावर्षी जानेवारी महिन्यात या मालिकेची वेळ बदलण्यात आली. ५ जानेवारीपासून ही मालिका रात्री १०:३० वाजता प्रक्षेपित केली जात आहे. यामध्ये रेश्मा शिंदे, सुमीत पुसावळे, आशुतोष पत्की, प्रतीक्षा मुणगेकर, सविता प्रभुणे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.