Gharoghari Matichya Chuli fame Ashwini Mahangade: अभिनेत्री अश्विनी महांगडे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘अस्मिता’, ‘आई कुठे काय करते’ अशा मालिकांमधून लोकप्रिय झाली आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. सध्या ती ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत काम करत आहे.
अश्विनी महांगडे ही अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या आयुष्यातील विविध गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करते. तिच्या कामाबद्दल, तिच्या खासगी आयुष्याबद्दल ती व्यक्त होत असते. तसेच ती तिला आलेला अनुभवही सांगते.
आता तिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नाटकाच्या प्रयोगासाठी तिला सिंदखेड राजा येथे पोहोचायचे होते. यावेळी तिला काय अडचणी आल्या आणि शेवटी ती तिथे कशी पोहोचली याबद्दल तिने लिहिले.
अश्विनी महागंडे म्हणाली…
अश्विनी महांगडेने लिहिले, “आजच्या महानाट्याच्या प्रयोगाला काल दुपारी ४ वाजल्यापासून ते आज ११ वाजेपर्यंत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असा प्रवास करून पोहोचले. सिंदखेड राजा येथे मी कधीच आले नाही, पण येण्याची मनापासून इच्छा होती. जिजाऊसाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त आज महानाट्य ‘गडगर्जना’ सादर होत आहे.”
पुढे तिने लिहिलं, “काल विमान कॅन्सल झालं. थोड्या वेळेसाठी मला काहीच सुचत नव्हतं. दुसरं विमान, रेल्वे किंवा अजून काहीतरी असे मनात विचार येत होते, प्रयत्न सुरू होते. इतरांनाही समजत नव्हतं की आता काय करायला हवं.”
“आम्ही जिथे जेवायला थांबलो होतो, त्या हॉटेलच्या मालकांना श्रीने अडचण सांगितली. शुभम भैयांनी बादल भैयाला बोलावून घेतले. त्यांनीच सगळे मॅनेज केले. दोन उत्तम माणसं सारथ्य करतील, तेही दिवस-रात्र तर योग्यस्थळी मी पोहोचणारच, या विचाराने माझा प्रवास सुरू झाला. हा प्रवास अद्भुत आहे, कारण मागील ३ दिवस जे माझ्याबरोबर घडते आहे आणि त्यानंतर तर विश्वास बसला की देव आहे, काय पाहिजे ते फक्त मागा.”
“श्री, अथर्व आणि मला हाच प्रश्न होता की हे का सगळं घडत आहे? आम्ही एका उत्तम कारणासाठी भेटलो आणि ते पूर्ण करून आमचा प्रवास सुरू झाला.”
“आजचा महानाट्याचा प्रयोग हा मला करायचाच होता, कारण ही माझ्याकडून जिजाऊसाहेबांना मानवंदना असेल. पण, या सगळ्या माणसांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळेच कामाप्रती माझा शब्द मी पाळला.”
अश्विनीने असेही लिहिले, “आभार मानून मोकळे होणे माझ्या स्वभावात नाही. अशा माणसांचे ऋण आपण फेडू शकत नाही”, असे म्हणत अभिनेत्रीने भावना व्यक्त केल्या.
