‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत जानकी आणि ऋषिकेश यांच्यासमोर उभी असलेली आव्हानं संपता संपत नाहीत, असं दिसतंय. सौमित्रशी लग्न न होऊ शकल्यानं दुखावलेली ऐश्वर्या रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची शपथ घेते. ऐश्वर्या आपल्या कुटुंबातील माणसांना एकमेकांपासून लांब करण्यासाठी त्यांच्यात भांडणं लावून देत आहे, हे जानकीच्या लक्षात येतं. म्हणूनच ऐश्वर्याची सगळी कटकारस्थानं उधळून लावण्याचा जानकी कायम प्रयत्न करीत असते. घरातील मोठी सून या नात्यानं रणदिवे कुटुंबासाठी जानकी ऐश्वर्याचे सगळे डावपेच हाणून पाडते.

जानकीला आपलं सत्य कळलं असल्याचं जेव्हा ऐश्वर्याला समजतं तेव्हा ती रणदिवे कुटुंबाला नेस्तनाबूत करून टाकेन, असं चॅलेंज जानकीला देते. तिचं हे चॅलेंज स्वीकारत, ‘तुझं सत्य सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही’, असं जानकी ऐश्वर्याला प्रत्युत्तर देते. या सगळ्याची सुरुवात ऐश्वर्या सुमित्रा रणदिवेपासून करते. जानकीविरुद्ध सुमित्राच्या मनात विष पेरण्यात ऐश्वर्या यशस्वीदेखील होते. हृषिकेश सुमित्राचा सावत्र मुलगा असल्याचं सत्य मुद्दामहून जानकीनं सगळ्यांसमोर आणलं असल्याचं ऐश्वर्या सुमित्राला पटवून देते. ऐश्वर्याच्या बोलण्यात आलेल्या सुमित्राच्या मनात आपल्या मोठ्या सुनेबद्दल कटुता यायला लागते.

हेही वाचा- Video : “शाळेत घडणाऱ्या अत्यंत वाईट…”, मास्तरीणबाईंचं गणपती बाप्पांना साकडं; म्हणाली, “मुलांची नजर कशी…”

पण, एवढंच सगळं करून थांबेल ती ऐश्वर्या कसली! पुढे ती गॅस चालू ठेवून त्यावर रिकामं भांडं ठेवत त्याचं खापर जानकीवर टाकते; जेणेकरून घरातल्या सदस्यांचा तिच्यावर विश्वास राहणार नाही. मात्र, आता जानकी ऐश्वर्याचा चांगलाच समाचार घेत असल्याचे स्टार प्रवाह वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर होत असलेल्या मालिकेच्या नवीन प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. जोपर्यंत ऐश्वर्या जानकीला त्रास देत होती तोपर्यंत तिनं ते सहन केलं; मात्र आता ऐश्वर्या आता आपल्या मुलीच्या जीवावर उठली असल्याचं लक्षात येताच, जानकी त्याचा जाब ऐश्वर्याला विचारते. प्रोमोमध्ये दाखविल्याप्रमाणे जानकी ऐश्वर्याला म्हणते, “माझ्या मुलीच्या केसाला जरी धक्का लागला, तर मी तुला सोडणार नाही.” जानकी ऐश्वर्यावर हात उचलणार तेवढ्यात सुमित्रा म्हणजेच जानकी व ऐश्वर्या यांच्या सासूबाई मधे येत जानकीला अडवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी सुमित्रा रणदिवे जानकीला म्हणतात, “जिच्यावर तू हात उचललास ना तिनं वाचवलं आहे तुझ्या मुलीला गुंडांच्या तावडीतून. तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती जानकी,” असं रागानं बोलून जानकीच्या सासूबाई निघून जातात.

हेही वाचा – Video : रेवाचं सत्य अक्षय सर्वांसमोर आणणार का? ‘मुरांबा’ मालिकेत येणार नवीन वळण; ‘या’ दिवशी असेल महाएपिसोड

या सगळ्यानंतर ऐश्वर्या जानकीला म्हणते, “आता येतेय ना खेळात मज्जा!” त्यावर रागावलेली जानकी ऐश्वर्याचा हात पिळत तिला म्हणते, “माझ्या मुलीच्या जीवाशी खेळाताना तुला मजा येत असेल ना, तर तुझा खेळखंडोबा करायला मला वेळ लागणार नाही.” जानकीचं हे रौद्र रूप ११ सप्टेंबरच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे. कुटुंबाला सावरून घेणारी प्रेमळ जानकी आजवर मालिकेत दाखवण्यात आली आहे. मात्र, जेव्हा ऐश्वर्यानं तिच्या मुलीच्या जीवाशी खेळत निर्दयतेची हद्द पार केलीय हे कळतं तेव्हा जानकी आता ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. आता तरी ऐश्वर्याचं सत्य रणदिवे कुटुंबासमोर येणार का हे ११ सप्टेंबरला संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांसमोर येणार आहे.