अभिनेत्री गिरिजा ओक गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. तिचा निळ्या साडीवरचा फोटो सर्वत्र तुफान व्हायरल होऊन अभिनेत्री रातोरात नॅशनल क्रश झाली. वैयक्तिक आयुष्यात गिरिजा ओकने २०११ मध्ये निर्माता सुहृद गोडबोलेशी लग्न केलं. अभिनेत्री प्रसिद्ध दिग्दर्शक व लेखक श्रीरंग गोडबोले यांची सून आहे.
गिरिजाने नुकतीच सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करींब’ कार्यक्रमात आपल्या आईसह उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीने आवर्जून आपल्या सासूबाईंविषयी सांगितलं. गिरिजाच्या सासूबाई गीता गोडबोले या प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिझायनर आहेत. त्या कायम तिला पाठिंबा देतात, तिचे खूप लाड करतात.
गिरिजा सासूबाईंबद्दल म्हणते, “कबीर आजीला ( गिरिजाच्या सासूबाई ) जेव्हा सांगतो, की त्याला काहीतरी खावंसं वाटतंय. त्याआधी आजीने ती गोष्ट करायला घेतलेली असते. सेटवर त्या सगळ्यांचे खूप लाड करतात, सर्वांनाच हे माहिती असेल. त्यामुळे कबीरचे किती लाड होत असतील विचार करा…तिचं आधीच सगळं प्लॅनिंग झालेलं असतं. कबीर तिच्याकडे राहायला जाणार असेल तर ‘आज रात्री हे…मग उद्या हे, परवा ते करूया’ असा सगळा मेन्यू तिने फिक्स केलेला असतो. अगदी माझ्या आवडीचं जेवण सुद्धा ती आवर्जून बनवते. मला ती आधीपासूनच विचारून ठेवते, तू कोणकोणते दिवस घरी आहेस मला सांगून ठेव म्हणजे मी तसं प्लॅनिंग करते. तिला जेवण बनवायला खूप आवडतं आणि ती सर्वांचे मनापासून लाड करते.”
गिरिजाची आई यावर म्हणते, “खरंतर गीता माझी विहीण आहे. पण, ती माझेही खूप लाड करते. मी त्यांच्याकडे गेल्यावर मला वेगवेगळे पदार्थ बनवून खायला देते. ती खरंच खूप चांगली आहे. आम्ही दोघी आता खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. मी तिच्याकडे जाणार असेल तर गीता मला आधीच फोन करते आणि सांगते…आता यायचं असेल तेव्हा वेळ काढून ये, आपण दोघीच फिरायला जाऊयात. आम्ही दोघींनी एकत्र खरंच खूप मजा केलीये.”
सासूबाईंविषयी सांगताना गिरिजा पुढे म्हणाली, “मी खरं सांगू का…माझ्या सासूने माझे जास्त लाड केलेत. माझ्या आईने जरा मला शिस्तीत आणि धाकात वाढवलंय. आई मला सुट्टीच्या दिवशी सुद्धा सकाळी ७ वाजता उठवायची. पण, गीता ताई कायम तुला हवा तेवढा आराम कर असं सांगते. नऊ-दहा वाजेपर्यंत उठ. मी थोडं काही काम केलं की, ती आईला फोन करून सांगणार…अगदी सुगरण मुलगी आहे हो! आणि काय हवं? म्हणजे ती कायम खूश, आनंदी असते. माझा मुलगा कबीर प्रेमाने माझ्या सासूबाईंना गीता म्हणून हाक मारतो.”
