Girija Prabhu Hindi Tv Debut : गिरीजा प्रभू मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मालिका व चित्रपटांत काम करणारी गिरीजा नर्तिकासुद्धा आहे. ‘युवा डान्सिंग क्वीन’ या कार्यक्रमात सहभाग घेतल्यानंतर ती ‘स्टार प्रवाह’वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि त्यानंतर पहिल्याच मालिकेतून तिने अनेकांच्या मनात कायमचं घर केलं.
गिरीजाने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’नंतर त्याच वाहिनीवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेत काम केलं. परंतु, अवघ्या काही काळातच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर ती पुन्हा एकदा तिचा सहअभिनेता मंदार जाधवसह ‘तू चांदवा’ या गाण्यात झळकली. पण, अशातच आता गिरीजाने तिच्या चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
‘या’ हिंदी मालिकेतून झळकणार गिरीजा प्रभू
मराठी मालिकांमध्ये काम करत आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी गिरीजा आता हिंदी मालिकेतून झळकणार आहे. ‘दंगल टीव्ही’वर तिची ही नवीन मालिका सुरू होत आहे. अभिनेत्री यामध्ये मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे. बुधवारी इन्स्टाग्रामवर मालिकेचा प्रोमो शेअर करत तिने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. गिरीजाच्या या आगामी हिंदी मालिकेचं नाव ‘तीस के पार जब मिला प्यार’ असं आहे आणि यामध्ये तिच्याबरोबर अभिनेता पुलकीत जैन मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
मालिकेच्या कथानकाबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये गिरीजा ३२ वर्षांच्या स्त्रीची भूमिका साकारत आहे. जी कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यात इतकी व्यग्र असते की तिच्या लग्नाचं वय निघून गेलंय असं म्हणत लोक तिला टोमणे मारत असतात. अशावेळी तिची भेट एका मोकळेपणाने आणि बिन्दास्त आयुष्य जगणाऱ्या मुलाशी होते. त्यामुळे आता जबाबदारीचं ओझं असलेली मुलगी आणि बिन्दास्त आयुष्य जगणारा मुलगा एकत्र येतात तेव्हा काय घडतं हे या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. ३०शीनंतर तिला तिचं प्रेम मिळेल का, तिचं लग्न होईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तर मालिकेतून पाहायला मिळतील.
‘तीस के पार जब मिला प्यार’ ही मालिका कधी सुरू होणार आहे याबद्दल अद्याप नेमकी तारीख समोर आलेली नाही. परंतु, वाहिनीने व्हिडीओ शेअर करत लवकरच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली आहे. गिरीजा व पुलकित यांची ही नवीन मालिका ‘दंगल टीव्ही’वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यामध्ये या दोन कलाकारांव्यतिरिक्त इतर कोणते कलाकार झळकणार आहेत याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.
